कोल्हापूर – कळंबा परिसरात स्मशानभूमी होऊ नये, यासाठी गेल्या १६ वर्षांपासून तेथील नागरिक आंदोलन करत आहेत. तरी लोकभावनेचा विचार करून कळंबा येथील वादग्रस्त जागेत केवळ ख्रिस्ती नाही, तर कोणत्याही जाती-धर्माची दफनभूमी आणि स्मशानभूमी नको, अशी मागणी ‘कळंबा पाचगाव स्मशानभूमी दफनभूमी विरोधी आंदोलन समिती’चे समन्वयक सुनील सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली. या प्रसंगी माजी नगरसेवक मधुकर रामाने, पाचगावचे माजी सरपंच चंद्रकांत कांडेकरी, कळंबा ग्रामपंचायत सरपंच सुमनताई गुरव, माजी सरपंच महेंद्र घाटगे, उदय जाधव, विजय देसाई, सुधीर खडके, श्रीकांत मनोळे उपस्थित होते.
श्री. सुनील सामंत पुढे म्हणाले, ‘‘कळंबा, पाचगाव, सुनीता नरके वसाहत, एन्.टी. सरनाईकनगर, योगेश्वरी वसाहत, गणेश वसाहत, राजीव गांधीनगर अशा अनेक ठिकाणी असलेल्या नागरिकांचा विरोध डावलून कोल्हापूर महानगरपालिका हा प्रस्ताव लादत आहे. तरी जनभावना लक्षात घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या आणि आरक्षित जागेत ख्रिस्ती समाज दफनभूमीचा प्रश्न मार्गी लावावा.’’
पाचगावचे माजी सरपंच चंद्रकांत कांडेकरी म्हणाले, ‘‘ख्रिस्ती दफनभूमीचा प्रस्ताव वर्ष १९७२ पासून नगरपालिकेकडे प्रस्तावित होता. त्या वेळी शहराची व्याप्ती मर्यादित होती आणि मिळकती असलेला भाग हा शहराच्या बाहेर होता. आता ही जागा भर वस्तीत असून कळंबा कारागृहाच्या मागील बाजूस अवघ्या १९ फुटांवर आहे. या कारागृहात अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप असलेले गुन्हेगार ठेवण्यात येतात. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातूनसुद्धा अशा संवेदनशील ठिकाणी दफनभूमी अथवा स्मशानभूमी होणे अतिशय गैर आहे. या परिसरात कोणतेही बांधकाम करायचे असल्यास कारागृहाची अनुमती घेणे बंधनकारक असतांना महानगरपालिका प्रशासनाने कोणत्या नियमानुसार हा वादग्रस्त दफनभूमीचा प्रस्ताव संमत केला ?’’