‘मकरसंक्रांत’ या सणाचे महत्त्व !

गंगास्नानाविषयीचे एक प्रातिनिधिक छायाचित्र

१. ‘मकरसंक्रात’ हा देवतांचा ‘प्रभात काळ’ !

‘सूर्य ज्या दिवशी ‘मकर’ राशीत प्रवेश करतो, त्या दिवसाला ‘मकरसंक्रांत’, असे म्हटले जाते. या दिवसापासून उत्तरायण चालू होते. शास्त्रात उत्तरायणाच्या कालावधीला ‘देवतांचा दिवस’ असे म्हटले आहे, तर दक्षिणायनाच्या कालावधीला ‘देवतांची रात्र’, असे म्हटले आहे. अशा प्रकारे ‘मकरसंक्रात’ हा देवतांचा ‘प्रभात काळ’ आहे.

२. मकरसंक्रातीच्या दिवशी करायचे विधी आणि या दिवशी केलेल्या दानाचे महत्त्व

या दिवशी स्नान, दान, जप, तप आणि अनुष्ठान करणे, तसेच श्राद्ध करणे इत्यादी कृती करण्याचे महत्त्व अधिक आहे.

या दिवशी केल्या गेलेल्या दानाचे फळ १०० पटींनी प्राप्त होते. या दिवशी तूप आणि घोंगडी यांचे दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी जो तूप आणि घोंगडी यांचे दान करील, त्याचे संपूर्ण भोग संपून त्याला मोक्षप्राप्ती होते.

माघे मासे महादेव यो दास्यति घृतकम्बलम् ।
स भुक्त्वा सकलान् भोगान् अन्ते मोक्षं च विन्दति ॥

अर्थ : हे महादेव, माघ मासात जो तूप आणि घोंगड्या दान करतो, तो सर्व भोग भोगून शेवटी मोक्ष प्राप्त करतो.

३. मकरसंक्रांतीच्या दिवशी तीर्थराज प्रयाग येथे स्नान करण्याचे महत्त्व

मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगास्नान, तसेच गंगेच्या तटावर केलेल्या दानाचे विशेष महत्त्व आहे. तीर्थराज प्रयाग, तसेच गंगासागर येथील मकरसंक्रांतीचे पर्वस्नान प्रसिद्ध आहे. ‘प्रयाग येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर मकरसंक्रांतीच्या दिवशी देवता स्वरूप पालटून स्नानासाठी येतात’, असे म्हटले जाते. मकरसंक्रांतीच्या दिवशी येथे स्नान करणे, म्हणजे अनंत पुण्याचे एकत्रित फळ प्राप्त करण्यासारखे आहे.

३. ‘गंगासागर’ तीर्थाची पौराणिक पार्श्‍वभूमी !

गंगासागर येथे भरणार्‍या मेळाव्याला पौराणिक कथेची पार्श्‍वभूमी आहे. मकरसंक्रांतीला गंगादेवी स्वर्गातून उतरून भगीरथाच्या पाठून चालत कपिलमुनीच्या आश्रमात जाऊन सागराला मिळाली. गंगामातेच्या पावन जलाने राजा सगरच्या अनेक शापग्रस्त पुत्रांचा उद्धार झाला. या घटनेच्या स्मृतीमुळे हे तीर्थ ‘गंगासागर’ या नावाने विख्यात झाले आहे.

४. ज्योतिषशास्त्रानुसार मकरसंक्रात, म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करणे, म्हणजेच अंधारातून प्रकाशात झालेले परिवर्तन !

ज्योतिषशास्त्रानुसार मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्याचे एका राशीतून दुसर्‍या राशीत झालेल्या परिवर्तनाला ‘अंधकारातून प्रकाशाकडे झालेले परिवर्तन’, असे मानले जाते. मकरसंक्रांतीपासून दिवसाचा कालावधी वाढत जातो आणि रात्रीचा कालावधी न्यून होतो. या काळात दिवसाचा कालावधी मोठा झाल्यामुळे प्रकाश अधिक असतो आणि रात्रीचा कालावधी न्यून झाल्याने काळोख न्यून असतो. सूर्य ऊर्जेचा अखंड आणि अमर्याद स्रोत आहे. सूर्याच्या किरणाने प्राणी जगतामध्ये चेतना निर्माण होऊन त्यांच्या कार्यशक्तीमध्ये वृद्धी होते. यामुळेच भारतीय संस्कृतीत ‘मकरसंक्रांत’ हा सण साजरा करण्याचे विशेष महत्त्व आहे.

५. भारतात विविध ठिकाणी विविध नावांनी मकरसंक्रात साजरी केली जात असणे

मकरसंक्रांतीचा सण उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये ‘खिचडी’, दक्षिण भारतात ‘पोंगल’, पंजाब, तसेच जम्मू-काश्मीर या ठिकाणी ‘लोहिडी’, आसाममध्ये ‘बिहू’ आणि सिंधी समाजात ‘लाल लोही’ या नावांनी साजरा केला जातो.’

(साभार : मासिक ‘सत्संग पथ’, जानेवारी २००५)