मकरसंक्रांत

आज (१५ जानेवारी २०२४) मकरसंक्रांत आहे. त्या निमित्ताने…

 

१. सूर्याचे मकर राशीत संक्रमण

‘सूर्य एका राशीतून दुसर्‍या राशीत संक्रमण करतो, त्याला ‘संक्रांत’, असे म्हणतात. प्रत्येक वर्षात १२ संक्रांती येतात. त्यातील आषाढ आणि पौष मासांतील सूर्याची संक्रमणे अधिक महत्त्वाची मानली जातात; कारण आषाढात सूर्य कर्क राशीत संक्रमण करतो, जे ‘दक्षिणायन’ होते आणि पौष मासात तो मकर राशीत प्रवेश करतो, म्हणजे त्याचे ‘उत्तरायण’ होते. भारतियांनी मकर संक्रमणाचे महत्त्व अधिक मानले आहे. ते पुण्यकारक मानलेले आहे. या उत्तरायणाचा महिमा केवढा, तर इच्छामरणी पितामह भीष्म प्राण सोडायचे थांबले होते तेही उत्तरायण चालू होईपर्यंत ! ‘उत्तरायणात मरण आले, तर चांगली गती मिळते’, असे म्हटले जाते. केवळ मरणानंतरच नव्हे, जगतांनाही चांगली गती, प्रगती होण्यासाठी उत्तरायणच आवश्यक ! भारतियांच्या दृष्टीने मकर संक्रमणाने उत्तर गोलार्धात रहाणार्‍या भारतियांना त्यामुळे अधिक प्रकाश आणि उष्णता यांचा लाभ होत असल्याने ते उत्सवाच्या स्वरूपात स्वागतार्ह वाटते. आर्य लोक उत्तर ध्रुवावर रहात होते. त्यांना ते अधिक आनंददायक वाटत असले पाहिजे.

२२ डिसेंबरच्या सुमारास सूर्य सायन धनु राशीतून निरयन मकर राशीत आणि नंतर साधारणपणे २३ दिवसांनी, म्हणजे १४ जानेवारीच्या सुमारास मकर राशीत प्रवेश करतो. शुद्ध निरायन पंचांगानुसार (टिळक पंचांग) हा प्रवेश १० जानेवारीला असतो. साधारणपणे वर्ष १९१५ च्या सुमारास हे संक्रमण १३ जानेवारीला येत असे. सध्या ते १४ जानेवारीस होते आणि पुढे हळूहळू १५ जानेवारी असेल.

२. मकरसंक्रांत साजरा करण्याची पद्धत

हा सण सूर्यावर आधारित आहे. अन्य सण चंद्रमासावर आधारित असतात. हा आनंदाचा सण आहे. संक्रांतीचा कुळाचार ३ दिवसांचा असतो. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी ‘भोगी’ असते. त्या वेळी तीळ लावलेली भाकरी, मुगाच्या डाळीची खिचडी, सोलाण्याची भाजी करून सूर्योदयाला देवाला नैवेद्य अर्पण केला जातो. नंतर तो प्रसाद म्हणून घेतला जातो. हा उपभोगाचा सण म्हणून याला ‘भोगी’, असे म्हणतात. संक्रांतीच्या वेळी असणार्‍या थंडीमुळे या सणाला तिळाचे महत्त्व अधिक आहे. वैज्ञानिक दृष्टीनेही तिळाचे तेल लाभदायक असते. थंडीने अंग फुटणे, मसाज, केसांची वाढ यांसाठी तिळाचे तेल उत्तम ! तिळातील स्नेह आणि गुळाची गोडी म्हणून तीळगूळ वाटतात. गुळामध्ये लोह असते आणि गूळ साखरेपेक्षा चांगला असतो.

३. संक्रांत आणि किंक्रांत यांमागील पौराणिक कथा

संकरासुर आणि किंकरासुर नावाच्या २ दैत्यांनी ऋषिमुनींना त्रस्त करून सोडले होते. देवीने संकरासुराचा वध केला आणि दुसर्‍या दिवशी किंकरासुराला मारले. प्राण सोडतांना दोघांनी देवीकडे पाहून हात जोडले; म्हणून हा कुलाचार त्यांच्या नावाने म्हणजे ‘संक्रांत’ आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी ‘किंक्रांत’ म्हणून प्रसिद्ध पावला. किंक्रांतीला ‘कर’ असेही म्हणतात. हा दिवस शुभ मानला जात नाही.

४. संक्रांत येणे म्हणजे काय ?

शास्त्राचा भाग म्हणून पंचांगात संक्रांतीचे फळ दिलेले असते. त्यात देवीचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार अशा वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. गणितानुसार पावसाचा अंदाज आणि त्यावरून येणारी सुबत्ता किंवा दुष्काळ सांगण्यासाठी याचा उपयोग होतो. पंचांगात त्याचे चित्रही असते. ती वाहनावरून एका दिशेकडून दुसर्‍या दिशेकडे जाते आणि तिसर्‍या दिशेकडे पहात असते. ‘ती ज्या दिशेकडून येते, त्या दिशेला समृद्धी आणि जिकडे जाते अन् पहाते तिकडे संकट येते’, असे समजतात. हे सर्व गणितावर अवलंबून केलेले भाकित असते. ‘जिकडे संकट येते, अशी समजूत असल्याने संक्रांत येणे, म्हणजे संकट येणे’, हा वाक्प्रचार रूढ झाला आहे.

५. संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का परिधान करतात ?

संक्रांतीला काळ्या रंगाचे महत्त्व आहे. अन्य सणाला हा रंग वापरत नाहीत; पण या मागचे शास्त्रीय कारण, म्हणजे थंड प्रदेशाच्या भागावर हळूहळू सूर्याचा प्रकाश पडू लागल्याने उबदारपणा येण्यासाठी काळा रंग वापरतात; कारण काळ्या रंगात उष्णता शोषली जाते; म्हणून स्त्रिया काळ्या रंगाच्या साड्या नेसून हळदी-कुंकू करून तीळगूळ आणि काही वस्तूंचे वाण देतात. याला ‘लुटणे’ असे म्हणतात.

६. ‘सुगडा’चे महत्त्व

सुवर्ण आणि माती या दोन्ही प्रकारच्या भांड्यांना भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे म्हणतात की, वाघिणीचे दूध केवळ सोन्याच्या पात्रातच ठेवता येते. अन्य धातू त्या दुधात विरघळतात. मातीच्या सुगडात किंवा खरा शब्द ‘सुघट’ आहे; ज्याचा अपभ्रंश होऊन ‘सुगड’ शब्द झाला. त्या सुघटात सुगीचा मोसम म्हणून उसाचे तुकडे, गहू, बोरे, तीळगूळ, हळदी-कुंकू, कापूर, दक्षिणा घालून त्यावर हळदी-कुंकवाच्या रेघा काढून सुवासिनी महिलेला वाण देतात. माती हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा घटक ! जन्म-मृत्यूचे ठिकाण म्हणून मातीच्या सुघटाला अधिक महत्त्व. आता शास्त्रीय प्रयोगांनी हे सिद्ध झाले आहे, ‘मातीच्या भांड्यातील पदार्थ अधिक चवदार, अल्प तेलात, पौष्टिक की जो शरिराला अधिक उपयोगी’, असा होतो.

७. भारतभरात साजरी केली जाणारी संक्रांत

देशातील सर्व भागांत हा सण साजरा केला जातो. बंगालमध्ये काकवी आणि तीळ घालून बनवलेला ‘तिळुआ’ हा पदार्थ अन् तांदुळाच्या पिठात तूप, साखर घालून केलेला ‘पिष्टक’ हा पदार्थ खातात अन् वाटतात; म्हणून त्याला ‘तिळुक्षा संक्रांती’ आणि ‘पिष्टक संक्रांती’, असे म्हणतात. दक्षिणेकडे संक्रांतीला ‘पोंगल’ म्हणतात. ‘या दिवशी केले जाणारे तीर्थस्नान, दान पुण्यकारक मानले आहे; म्हणूनच तिळाप्रमाणे स्निग्धता आणि गुळाप्रमाणे गोडवा याचे प्रतीक म्हणून तीळगूळ देऊन परस्परातील स्नेह अन् माधुर्य वाढवावे’, असा संदेश देणारा, समाजाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असा हा सण सर्वत्र उत्साहाने साजरा करतात. आपणही म्हणूया ‘तीळगूळ घ्या, गोड बोला !’

– दीपा जोशी

(साभार : मासिक ‘जेष्ठविश्‍व’, जानेवारी २०१९)