बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील काँग्रेस सरकारने अयोध्येत श्रीराममंदिरात दर्शनासाठी जाणार्या राज्यातील भाविकांच्या सोयीसाठी अयोध्येत ‘कर्नाटक यात्री निवास’ बांधण्याची घोषणा केली आहे. या यात्री निवासामध्ये भाविकांची रहाण्याची आणि जेवणाची व्यवस्था असणार आहे. या संदर्भात कर्नाटक सरकारच्या धर्मादाय विभागाने उत्तरप्रदेश सरकारला पत्र लिहिले आहे. या यात्री निवासासाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. हे यात्री निवास शरयू नदीजवळील ५ एकर जागेवर बांधण्यात येत आहे, असे कर्नाटकातील धर्मादाय विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये उत्तरप्रदेश सरकारला पत्र लिहून कर्नाटकातून अयोध्येत जाणार्या भाविकासांठी शरयू नदीजवळ यात्री निवास बांधण्यासाठी अनुमती मागितली होती. त्याआधी भाजपचे नेते बी.एस्. येडियुराप्पा यांनीही उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले होते. या पत्रांला उत्तरप्रदेश सरकारच्या गृहनिर्माण संस्थेकडून सकारात्मक प्रतिसाद कळवण्यात आला आहे.