‘ससून रुग्णालया’तील वाहनतळाची निविदा रहित !

सध्या वाहनतळाची सुविधा विनामूल्य

पुणे – ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’तील वाहनतळाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने समयमर्यादेत आवश्यक ती कागदपत्रे सादर न केल्यामुळे ही नवीन निविदा प्रक्रिया रहित करण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली आहे. त्यामुळे सध्या वाहनतळाची सुविधा विनामूल्य देण्यात येत आहे. (योग्य ठेकेदारांची निवड न करता येणारे रुग्णालय प्रशासन काय कामाचे ! – संपादक)

आधीच्या ठेकेदाराने ‘ससून’मध्ये १६ लाख ७६ सहस्र रुपयांचा अपहार केला होता. (वाहनतळाच्या अपहाराशी संबंधित अधिकार्‍यांवर प्रशासन कारवाई करणार का ? – संपादक) त्यामुळे नवीन निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. आलेल्या निविदांची पडताळणी करून सर्वाधिक बोली लावणार्‍या निविदाधारकास मूळ कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्याला समयमर्यादा देऊनही कागदपत्रे सादर न केल्यामुळे ठेका रहित करावा लागला. आता पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

पूर्वीचे ठेकेदार ‘एस्.के. एंटरप्रायझेज कंपनी’ने प्रतिमाह १ लाख ५१ सहस्र ५०० रुपये देणे अपेक्षित होते; परंतु त्यांनी वर्षभर कोणतेही शुल्क भरले नाही. दिलेले धनादेश अधिकोषामध्ये वटले नाहीत. त्यामुळे ‘ससून’चे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी बंडगार्डन पोलिसांना पत्र पाठवून गुन्हा नोंद करण्याची विनंती केली होती. (रुग्णालय प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा ! संबंधित ठेकेदारांकडून पैसे वसूल करणे आवश्यक आहे ! – संपादक)