काँग्रेसच्या नेत्यांनी श्रीराममंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण नाकारले !

भाजप आणि रा.स्व. संघ यांचा प्रकल्प असल्याची टीका !

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी

नवी देहली – काँग्रेसने २२ जानेवारीला अयोध्येत श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित न रहाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या नेत्यांनी उद्घाटनाचे निमंत्रण नाकारले आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. यात म्हटले आहे की, धर्म ही वैयक्तिक गोष्ट आहे; मात्र रा.स्व. संघ आणि भाजप यांनी दीर्घकाळापासून अयोध्येतील मंदिराचे रूपांतर राजकीय प्रकल्पात केले आहे. केवळ राजकीय लाभासाठी भाजप आणि संघ यांच्या नेत्यांकडून अपूर्ण मंदिराचे उद्घाटन केले जात आहे. वर्ष २०१९ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करत आणि श्रीरामाच्या लाखो भाविकांचा आदर ठेवून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील पक्षाचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारले आहे.

संपादकीय भूमिका

  • श्रीराममंदिर हा भाजप आणि संघ यांचा प्रकल्प वाटणार्‍या काँग्रेसने हे मंदिर बांधण्यास विरोध केला होता, हे जगजाहीर आहे. त्यामुळे काँग्रेसची मुळातच मंदिर होण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे तिचे नेते मंदिराच्या उद्घाटनाला कसे जातील ?