नवी देहली – भगवान श्रीरामाच्या अयोध्येतील भव्य मंदिरासाठी देश-विदेशातील रामभक्तांनी उदार मनाने देणगी दिली आहे. ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने दिलेल्या माहितीनुसार मंदिराच्या समर्पण निधी खात्यात आतापर्यंत ३ सहस्र २०० कोटी रुपये जमा झाले आहेत, तर आतापर्यंत श्रीराममंदिराला एकूण ५ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक देणग्या मिळाल्या आहेत.
अर्पण निधीच्या व्याजातूनच आतापर्यंत झाले मंदिराचे बांधकाम !
श्रीराममंदिर ट्रस्टने देशातील ११ कोटी लोकांकडून ९०० कोटी रुपये उभे करण्याचे ध्येय ठेवले होते; मात्र गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत ५ सहस्र कोटींहून अधिक रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत अनुमाने १८ कोटी रामभक्तांनी मंदिराच्या उभारणीसाठी बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्या खात्यांमध्ये अनुमाने ३ सहस्र २०० कोटी रुपयांचा समर्पण निधी जमा केला आहे. ट्रस्टने या बँक खात्यांमध्ये दान केलेल्या पैशांची ‘एफ्.डी’ (मुदत ठेव) केली होती, ज्यावरील व्याजामध्येच मंदिराचे आतापर्यंतचे बांधकाम झाले आहे.