PurpleFest2024 : ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२४’चे उद्घाटन

पणजी : ६ दिवसांच्या ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२४’चे उद्घाटन ८ जानेवारीला राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेच्या धर्तीवर सर्वसमावेशकतेचा संदेश देत झाले. उद्घाटन समारंभाला संबोधित करतांना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनाच्या काही घंटे आधी सकाळी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल वैयक्तिकरित्या विचारपूस केली होती.’’ कार्यक्रमात गोव्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनीही सर्वसमावेशकतेचा उत्सव साजरा करणार्‍या या उत्सवातील सहभागींसाठी पंतप्रधानांचा संदेश वाचून दाखवला.

‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टच्या उद्घाटनप्रसंगी , मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मान्यवर

पणजी येथे झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री वीरेंद्र कुमार हेही उपस्थित होते. ‘गोव्याची भूमी केवळ रंगानेच नाही, तर भावनेनेही जांभळ्या रंगाची झाली आहे’, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी भाषणाच्या प्रारंभी म्हटले. वर्ष २०२३ मध्ये गोव्यात झालेल्या राष्ट्रीय पर्पल फेस्टचा पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात विशेष उल्लेख झाल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली.

‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टच्या उद्घाटनप्रसंगी डावीकडून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री सुभाष फळदेसाई आणि खासदार सदानंद शेट तानावडे

मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले, ‘‘विकलांग (दिव्यांग) व्यक्ती केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी विशेष आहेत. ते विकलांग नसून देशासाठी विशेष आहेत.’’ मुख्यमंत्री सावंत यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधानांच्या कौशल्य भारत, ‘फिट इंडिया’ आणि सर्वसमावेशक भारत या घोषणांना पुढे नेण्यावर भर दिला.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की, हा सण सर्वसमावेशकतेच्या भावनेने साजरा करतो. हा एक टप्पा आहे, जिथे प्रत्येक जण महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केंद्रात स्वतंत्र मंत्रालय निर्माण करून विकलांग व्यक्तींवर विशेष भर दिला आहे.

अमेरिकेतील ‘व्हॉईस ऑफ स्पेशली एबल्ड पीपल’चे राजदूत डॉ. कॅरेन डार्क म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट हा एक अद्वितीय उत्सव आहे, जो विकलांग व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी समर्पित भारताचा सर्वसमावेशक उत्सव दर्शवतो. तो आम्हाला पुढील ६ दिवस शिकण्यासाठी एकत्र आणतो. वर्ष २०४७ मध्ये विकलांंगत्व अर्थव्यवस्था क्षेत्र एक ट्रिलियन डॉलरनी भरभराट होईल.राज्याचे विकलांग आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनीही या मेळाव्याला संबोधित केले.