काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा तलाठी भरती परीक्षेत अपव्यवहार झाल्याचा आरोप !
पुणे – तलाठी भरती परीक्षेत मोठा अपव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक (एस्.आय.टी.) नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, ते मिळाल्यास परीक्षा रहित करण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ७ जानेवारी या दिवशी पुण्यातील नवीन भाजप कार्यालयाला भेट दिली. त्यांनी कार्यालयाची पहाणी केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
तलाठी भरतीत राज्यात मोठा अपव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याविषयी विचारणा केली असता फडणवीस म्हणाले की, तलाठी भरती परीक्षा ही राज्यात अतिशय पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली. या परीक्षेत कोणताही अपव्यवहार झाल्याचा पुरावा कुणीही दिल्यास त्याची चौकशी केली जाईल.