पुणे – अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्या ‘श्रीराम मंदिर’ उद्घाटनाच्या आणि ‘श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापने’चे घरोघरी जाऊन अक्षता (निमंत्रण) देण्यास १ जानेवारी २०२४ पासून प्रारंभ करण्यात आला. ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’च्या ‘पुणे महानगर समिती’च्या वतीने माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पालकमंत्री अजित पवार यांच्यासह उद्योजक, धार्मिक संस्थांचे प्रमुख आणि अन्य मान्यवरांना ‘अक्षता’ वितरण अन् निमंत्रण देण्यात आले.
‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’कडून २१ सहस्रांहून अधिक रामसेवक १५ जानेवारीपर्यंत घरोघरी जाऊन अक्षतांचे निमंत्रण देणार आहेत. ११ लाखांहून अधिक घरांमध्ये निमंत्रण देण्याचे गृहसंपर्क अभियान पूर्ण होईल. त्यानंतर २२ जानेवारीपर्यंत शहरातील २ सहस्रांहून अधिक मंदिरांमध्ये भजन, श्रीराम नामजप, आरती, रांगोळी आणि नृत्यांचे कार्यक्रम, पथनाट्य सादरीकरण, कलाकार कट्ट्यांवर विविध कलांचे सादरीकरण, सोसायट्या अन् मंदिरांमधून ‘रामसंकीर्तन’ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.