Bangladeshi Infiltrators : पुणे येथे बांगलादेशी घुसखोरांनी मिळवली ६०४ बनावट पारपत्रे !

पुणे – बांगलादेशी घुसखोरांनी पुण्यात ६०४ बनावट पारपत्रे मिळवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून चौकशी चालू आहे, तसेच या प्रकरणी अनेकांना अटकही करण्यात आली आहे. पुणे शहर परिसरात अवैध वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पोलिसांनी काही मासांपूर्वी कारवाई केली होती. बांगलादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ६०४ पारपत्रे मिळवल्याचे अन्वेषणात उघडकीस आले आहे. बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरी प्रकरणी हडपसर, वानवडी, भारती विद्यापीठ आणि फरासखाना या पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी २९ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे.

कारवाईनंतर पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांची चौकशी केली. तेव्हा बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी ६०४ पारपत्रे मिळवल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी याची गंभीर नोंद घेतली आहे. (घुसखोरांनी एवढी बनावट पारपत्रे काढली नसती, तर पोलिसांनी अशी कारवाई केली नसती ! अवैध घुसखोरीकडे दुर्लक्ष करणार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे ! – संपादक) साहाय्यक पोलीस आयुक्त रमाकांत माने आणि पुणे पोलिसांच्या पारपत्र पडताळणी विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस्. हाके यांनी पारपत्र पडताळणी करणार्‍या कर्मचार्‍यांना सूचना दिल्या आहे.

व्यक्तीगत चौकशीचा आदेश !

पारपत्र मिळवण्यासाठी अर्ज करणार्‍या नागरिकांची व्यक्तीगत चौकशी करावी, तसेच अर्जदार नागरिकांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी करावी. परिसरातील नागरिकांकडे वास्तव्याविषयी चौकशी करण्यात यावी, असे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत.

पडताळणी काटेकोरपणाने करावी !

पोलीस आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे की, आधारकार्ड, जन्मदाखला, तसेच अन्य आवश्यक कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणाने करावी. अवैध वास्तव्य करणार्‍या परदेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका 

  • बांगलादेशी घुसखोरांनी एवढी बनावट पारपत्रे मिळवेपर्यंत पोलीस झोपले होते का ? हे पोलिसांना लज्जास्पद !
  • भारतीय नागरिकत्वाचा कोणताही पुरावा नसताना घुसखोरांना आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र दिले जात असल्याने यंत्रणेविषयीच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतातील अनेक राजकीय पक्ष घुसखोरांच्या पुनर्वसनास प्रोत्साहन देत आहेत, जेणेकरून त्यांच्या मतपेढीत वाढ होईल. अवैध मार्गाने देशात घुसखोरी करणार्‍यांना पायघड्या घालण्याचे काम भारत सोडून अन्य कोणत्याही देशांत होत नसावे ! हे सरकारी यंत्रणा आणि संबंधित राजकीय पक्ष यांना लज्जास्पद !