सातवे पर्यावरण संमेलन कोंढापुरी, पुणेच्या उद्घाटन सोहळ्यातील मत
चिपळूण – निसर्गाचे फुलणे खुडणारा नव्हे, खुलविणारा विकास आपल्याला हवा आहे. भारतभरातील धरणात अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने गाळ साठत आहे. यावर्षी जमिनी ओल्या करण्याइतकाही पाऊस पडलेला नसतांना आषाढीच्या पालख्या पंढरपूरकडे निघाल्याचे आपण सर्वांनी अनुभवले आहे. सृष्टीतील सजीवतेसाठी विविधता (वैविध्य) टिकायला हवी आहे. एकुणच गुणवत्तापूर्ण जीवन जगण्यासाठी ‘हरितग्राम’ चळवळ आवश्यक असल्याचे मत कोकणातील पर्यटन आणि पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते, लेखक धीरज वाटेकर यांनी व्यक्त केले.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (एन्.जी.ओ.) आणि श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे आर्.एम्. धारीवाल सिंहगड मॅनेजमेंट स्कूल, कोंढापुरी (शिरूर) पुणे आयोजित सातवे पर्यावरण संमेलन कोंढापुरी (२४ डिसेंबर) येथे उद्घाटन सत्रात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर संमेलन अध्यक्ष ‘प्रसिद्ध हवामान अभ्यासक’ पंजाबराव डख, उद्घाटक आय.पी.एस्. अधिकारी पंकज देशमुख, चांगुलपणाची चळवळचे संस्थापक राज देशमुख, कोंढापुरी विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आणि माजी सरपंच स्वप्निलभैय्या गायकवाड, कोंढापुरीच्या सरपंच सौ. अपेक्षा गायकवाड, आर्. एम्. धारिवाल सिंहगड मॅनेजमेंट स्कूल कोंढापुरीच्या कॅम्पस डायरेक्टर डॉ. अनिता माने, पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, सचिव वनश्री मोरे गुणवरे होते.
धीरज वाटेकर पुढे म्हणाले,
१. जीवनस्तर उंचावण्याच्या अपेक्षांनी आपण ग्रासलोय; पण अवघ्या १-२ पिढ्यांत आपल्या अपेक्षा एवढ्या भव्यदिव्य कशा झाल्या ? याचा आपण विचारही करत नाही. पर्यावरणीय समस्यांचं मूळ इथे आहे.
२. आबासाहेब मोरे म्हणायचे, ‘वृक्षसंवर्धनाचं आपले काम जाणीव-जागृतीचे आहे.’ रेल्वेच्या एखाद्या डब्यासारखे लांबचलांब महाराष्ट्रभर पसरलेल्या या सामाजिक कामस्वरूप रेल्वेच्या डब्यात आजवर अनेक प्रवासी येऊन बसले. काही उतरले; पण ना हा डबा थांबला ना हे काम! काही प्रवासी पुन्हा नव्याने बसले. अजूनही काही नव्याने येतील.’ ३. एकविसाव्या शतकाची स्वतःची अशी वैशिष्ट्ये राहिली आहेत. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे नागरीकरण, मध्यमवर्गाचा कायाकल्प, संघटित क्षेत्रातील कामगार संघटनांचे दुर्बलीकरण यातून विषमता वाढीस लागल्याचे आबांसारख्या पर्यावरणप्रेमीच्या लक्षात आले.
४. मूल्यांपेक्षा किंमत, नात्यापेक्षा व्यवहार, शिक्षणापेक्षा शहाणपण आणि विचारापेक्षा कृती महत्त्वाची ठरल्याने व्यक्तींच्या धारणेत आमूलाग्र पालट झाले. मनुष्य टोकाचा आत्मरत आणि आत्मकेंद्री बनू लागला. ‘सेलिब्रेटी’ आणि सत्ताधीश समाजाचे ‘आयडॉल’ बनले. अशा काळात आपल्या विचार आणि आचारांमध्ये अंतर न पडू देता पर्यावरण चळवळ उभी करण्यासाठी आबासाहेब धडपडत राहिले.
पर्यावरण संतुलनासाठी ३३ टक्के भूक्षेत्र जंगलव्याप्त असणे आवश्यक आहे. आपल्या देशात २० टक्के आहे. त्यातही ९ टक्के दाट जंगल शिल्लक आहे. बरेचसे वनक्षेत्र खासगी आहे. या पार्श्वभूमीवर वाटेकर यांनी त्यांच्या भाषणात ‘हरितग्राम’ कोंढापुरी गावातील पाणीदार चळवळीचा आढावा घेतला. दुष्काळी गाव अशी या गावाची पूर्वीची ओळख होती. भौगोलिक उंचवठा असल्याने गावातील विहिरींची पाणी पातळी अल्प असायची. नंतर प्रयत्नांती गावच्या पूर्वेला असलेल्या एका उंच डोंगरावर, पाणीदार परिसरात मल्हारगड आणि वनराई बहरली. गावात वर्ष १६३१ पासून अस्तित्वात असलेल्या भागीरथी बारव, पाणवठ्याची बारव, अंधेरी बारव आजही ऐतिहासिक म्हणून जपलेल्या आहेत.
‘तंत्रचळ’ लागलेल्या आजच्या पिढीच्या जगण्याचा वेग भयंकर आहे. माणसाचे व्यक्तीगत आयुष्य गुंतागुंतीचे झाले आहे. डिजिटल क्रांतीने केलेला धडाका सोसवेनासा झाला आहे. नातेसंबंध पालटत आहेत. माणसे एकटी पडत आहेत. ती एकमेकांना आभासी भेटत आहेत. १२-१५ वर्षांच्या मुलांत बकालीपणा, हिंसकवृत्ती वाढत चाललेली आहे. तंत्रज्ञानाचा रेटा आणि काळाच्या वेगामुळे त्वरेने निष्कर्ष आणि फळ मिळण्याची अपेक्षा वाढलेली आहे. भावनिक ओलावा हळूहळू नष्ट होत जाणार आहे. आभासी सामाजिकता हा प्रदूषणाचा नवा प्रकार निर्माण होतोय. मोठा दोष या व्यवस्थेने निर्माण केलेला आहे. आपल्याला हे सारं एका क्षणात पालटता येणार नाही; पण पर्यावरणाच्या क्षेत्रातील अराजकतेला विरोध करण्याचे, जाणीव जागृतीचे काम आपण स्वीकारले आहे, असेही वाटेकर यांनी या वेळी सांगितले.
या संमेलनाला रत्नागिरी जिल्ह्यातील वरिष्ठ राज्य कार्याध्यक्ष विलास महाडिक, जिल्हाध्यक्ष सतिश मुणगेकर, मायावती शिपटे, विनया देवरुखकर, ओंकार शिपटे, तृषाली कदम, मोहन पाटील उपस्थित होते.