मनोज जरांगे यांची मुंबईत २० जानेवारीपासून आमरण उपोषणाची घोषणा !

मनोज जरांगे पाटील

बीड – मुंबईत १९ जानेवारीपर्यंत कलम १४४ लागू आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात २० जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहे. सर्व मराठ्यांनी मुंबईला मला भेटण्यासाठी यावे. आता मुंबईतून आरक्षण घेऊनच पुन्हा यायचे. मुंबईला जातांना अजिबात हिंसाचार करू नका. जो हिंसा करेल, तो आपला नाही. जर पोलिसांनी अटक केली, तर पोलीस ठाण्यात बसून ‘आरक्षण द्या’, असे म्हणायचे, असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथील जाहीर सभेत केले.

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, आमदार, खासदार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला साहाय्य करावे, अन्यथा त्यांच्यासाठी मराठा समाजाचे दरवाजे कायमचे बंद होतील, हे त्यांनी लक्षात घ्यावे. मराठा आंदोलनाला कुणी नेता नाही, मीसुद्धा नेता नाही. २० जानेवारीपर्यंत आरक्षण देण्याचे सरकारने पहावे.