मराठी माणसांच्या हक्कासाठी आंदोलन करणार !

 ‘पार्ले पंचम्’ या संस्थेची चेतावणी

मुंबई – मांसाहारी मराठी माणसांना इमारतींमध्ये घर नाकारणे, विकासकाकडून मराठी माणसांची होणारी अडवणूक, मराठी माणसांची गळचेपी करणे याविरोधात विलेपार्ले येथील मराठी भाषिक नागरिकांनी आंदोलनाची चेतावणी दिली आहे. तसेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी रक्त सांडलेल्या हुतात्म्यांची आणि मुंबईत मराठी माणसाला ताठ मानेने जगण्यास शिकवणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ डिसेंबर या दिवशी क्षमा मागण्याचे ‘पार्ले पंचम्’ या संस्थेने ठरवले आहे.

‘पार्ले पंचम्’ या संस्थेने काही मासांपूर्वी राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या; मात्र त्यावर राज्य सरकारने काहीही निर्णय न घेतल्यामुळे हे आंदोलन पुकारल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्रीधर खानोलकर यांनी सांगितले. ‘फोर्ट येथील हुतात्मा स्मारकात वरळी नाका येथील आचार्य अत्रे स्मारक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी सकाळी ११.३० वाजता पुष्पचक्र वाहून क्षमायाचना करणार आहोत’, असेही खानोलकर यांनी सांगितले.

‘नवीन इमारतीत एक वर्षापर्यंत मराठी माणसांना घरांसाठी ५० टक्के आरक्षण ठेवावे’, अशी मागणीही संस्थेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.