गुन्हा नोंद होताच मुख्य आरोपी महंत चिलोजीबुवा गुरु हमरोजीबुवा पसार !

  • श्री तुळजाभवानीदेवीचे दागिने गहाळ झाल्याचे प्रकरण

  • गुन्हा नोंद होईपर्यंत महंत चिलोजीबुवा जिल्हाधिकार्‍यांसमवेत उपस्थित होते बैठकीला !

(महंत म्हणजे मंदिर किंवा मठ यांचे प्रमुख)

धाराशिव – श्री तुळजाभवानीदेवीच्या प्राचीन मौल्यवान दागिने चोरी झाल्याच्या प्रकरणी २० डिसेंबरला तुळजापूर पोलीस ठाण्यात सकाळी ७ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यात महंत चिलोजीबुवा गुरु हमरोजीबुवा हे मुख्य आरोपी आहेत. धक्कादायक म्हणजे एकीकडे हा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू असतांना दुसरीकडे जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शाकंबरी नवरात्र महोत्सवाच्या आढावा बैठकीत महंत चिलोजी बुवा गुरु हमरोजी बुवा उपस्थित होते. यानंतर मात्र महंत चिलोजीबुवा पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

गुन्हा नोंदवल्यानंतर महंत चिलोजीबुवा पोलिसांना कसे सापडले नाहीत ? त्यांना अटक का करण्यात आली नाही ? ते पसार कसे झाले ? त्यांना कुणी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का ? आदी प्रश्‍न भाविकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

तक्रारीत चांदीच्या मुकुटाचा अपहार झाल्याचीही नोंद !

या प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी तहसीलदार सोमनाथ माळी यांना तक्रार करण्यासाठी नियुक्त केले आहे. सोमनाथ माळी यांनी दिलेल्या तक्रारीत डबा क्र. ७ मधील चांदीच्या मुकुटाचा अपहार झाला असून हा चांदीचा मुकुट महंत चिलोजीबुवा गुरु हमरोजीबुवा यांच्याकडे वर्ष १९६३ ते २०११ या कालावधीत होता’, असे नमूद करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका 

गुन्हा नोंद होताच आरोपी पसार होणे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस कधी आतंकवाद्यांना काय पकडणार ?