वर्दळीच्या अनेक रेल्वेस्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी नियुक्त नसल्याने सुरक्षाव्यवस्था वार्‍यावर !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – रेल्वे विभागातील आकुर्डी, पिंपरी, कामशेत अशा अनेक महत्त्वाच्या स्थानकांवरून प्रतिदिन १० सहस्रांहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात; मात्र या रेल्वेस्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाचे (आर्.पी.एफ्.चे) एकही कर्मचारी नसल्यामुळे तेथील सुरक्षा वार्‍यावर असल्याचे चित्र आहे. सुरक्षादलातील कर्मचारी नसल्यामुळे अशा स्थानकांवर मद्यपान करणारे आणि नशा करणारे आदींचा वावर वाढला असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोहमार्ग पोलिसांचेही या ठिकाणी लक्ष नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. आर्.पी.एफ्.च्या पुणे विभागाकडे पुष्कळच अल्प मनुष्यबळ आहे. प्रत्येक स्थानकावर कर्मचारी नेमणे शक्य नाही. पुणे स्थानक येथे सुरक्षा देण्यासाठी कर्मचारी पुष्कळ अल्प पडत आहेत, असे आर्.पी.एफ्.च्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. लोहमार्ग पोलिसांनी इतर स्थानकांवर गस्त घातल्यास प्रवाशांना सुरक्षेची निश्चिती मिळेल, अशी अपेक्षा अनेक प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

संपादकीय भूमिका :

रेल्वेस्थानकावर पोलीस कर्मचारी नसणे म्हणजे प्रवाशांच्या जिवाशी एक प्रकारचा खेळच आहे. कर्मचार्‍यांना नियुक्त करण्यामध्ये हलगर्जीपणा करणारे दायित्वशून्य अधिकारी काय कामाचे ?