पुणे – दिवाळीच्या कालावधीत नदीपात्रात उभारलेल्या फटाका स्टॉलधारकांनी ‘स्टॉल’ काढल्यानंतर राडारोडा तेथेच टाकल्याने महापालिकेने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. अस्वच्छता केल्याप्रकरणी नदीपात्रातील ३४ स्टॉलधारकांच्या अनामत रकमेतून दंडाची रक्कम वसूल करावी, असा प्रस्ताव कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाने मालमत्ता व्यवस्थापन विभागाला दिला आहे; मात्र ‘कोणतीही पूर्वसूचना न देता दंड भरणार नाही’, असा पवित्रा टॉलधारकांनी घेतल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महापालिकेच्या नियमानुसार स्टॉलधारकांकडून किमान ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. क्षेत्रीय कार्यालयाकडे दंड भरल्याची पावती दाखवल्यानंतरच त्यांना अनामत रक्कम मिळणार आहे, असे साहाय्यक आयुक्त अमोल पवार यांनी सांगितले.
दिवाळीच्या कालावधीत मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून नदीपात्रात फटाका विक्री ‘स्टॉल’ उभारण्यास अनुमती दिली होती. ‘ऑनलाईन’ लिलाव पद्धतीने गाळे भाड्याने देण्यात आले होते. ‘स्टॉलधारकांनी दैनंदिन कचरा घंटागाडीला द्यावा’, अशी लेखी सूचना त्यांना देण्यात आली होती; मात्र स्टॉलच्या आजूबाजूचा परिसर आणि स्टॉल खालील बाजूला साठणारा कचरा तसाच ठेवण्यात आला होता.
संपादकीय भूमिका :आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! |