कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
कोल्हापूर – २ सप्टेंबर २०१६ या दिवशी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक करून राजारामपुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्या वेळी डॉ. तावडे यांनी पंचांच्या उपस्थितीत आणि पोलिसांच्या समोर माझे हर्नियाचे शस्त्रकर्म झाले आहे, माझ्या पायावर मारहाण केली आहे, तसेच माझ्या पोटावर बुटाने लाथ मारण्यात आली, असे सांगितले. या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टी असतांना यातील कोणतीच गोष्ट पंचनाम्यात नमूद नाही, असे अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. डॉ. तावडे यांना अटक करण्यात आल्यावर त्या प्रसंगी उपस्थित असणारे पंच विजय सपकाळ यांची साक्ष सरकार पक्षाच्या वतीने १३ डिसेंबरला नोंदवण्यात आली. त्या प्रसंगी उलटतपासणी घेतांना अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी न्यायालयात हे निदर्शनास आणून दिले.
अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी पंचांची उलट तपासणी घेतांना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, जेव्हा डॉ. तावडे यांना अटक करण्यात आली, तेव्हा ते डाव्या पायाने लंगडत चालत होते, तसेच ‘माझ्या डोक्याच्या उजव्या बाजूला दुखत आहे’, असेही सांगत होते. डॉ. तावडे यांना बुटाने मारलेल्या लाथेचा ठसा यांच्या सदर्यावर स्पष्टपणे दिसून येत होता, या सर्व गोष्टी पंचनाम्यात नमूद केलेल्या नाहीत, तसेच पंचांनाही सांगितलेल्या नाहीत. अधिवक्ता डी.एम्. लटके यांनी ‘डॉ. तावडे यांना अटक करण्यात आली, तेव्हा त्यांचा तोंडावळा झाकण्यात आला नव्हता’, हेही उलटतपासणीत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे. सरकारपक्षाच्या वतीने अधिवक्ता हर्षद निंबाळकर आणि अधिवक्ता शिवाजीराव राणे यांनी काम पाहिले. या प्रसंगी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनीही पंचांची उलटतपासणी घेतली.