|
नवी देहली – अमेरिकेतील प्रसारमाध्यम ‘इंटरसेप्ट’ने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार भारत सरकारने एप्रिल २०२३ मध्ये उत्तर अमेरिकेतील भारताच्या सर्व उच्चायुक्तालयांना एक गोपनीय संदेश पाठवला होता. त्यात शीख संघटनांच्या विरोधात कारवाया करण्यास सांगण्यात आले होते. यात काही शीख कार्यकर्त्यांची नावे होती. त्यांची भारताच्या अन्वेषण यंत्रणा शोध घेत होती. यात हरदीप सिंह निज्जर याचाही समावेश होता. या संदेशात म्हटले होते की, सर्व संशयितांच्या विरोधात ठोस पावले उचलण्याचा आदेश होता. यात थेट ठार मारण्याचा उल्लेख नव्हता. या संदेशाच्या २ मासांनंतर निज्जर याची हत्या झाली.
‘इंटरसेप्ट’च्या वृत्तात पुढे म्हटले आहे की, भारताने त्याच्या विरोधकांना ठार मारण्यासाठी स्थानिक गुंडांचे जाळे निर्माण केले आहे. असे जाळे पाकिस्तानमध्येही कार्यरत आहे. यामुळे निज्जरच्या हत्येनंतर अमेरिकेची अन्वेषण यंत्रणा एफ्बीआयने खलिस्तान्यांना सतर्क रहाण्याची चेतावणी दिली आहे.
भारताने गोपनीय संदेशाचे वृत्त फेटाळले !
‘इंटरसेप्ट’चे भारताच्या गोपनीय संदेशाविषयीचे वृत्त भारत सरकारने फेटाळले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या वृत्ताला खोटे ठरवले आहे. बागची म्हणाले की, गोपनीय संदेश एक कल्पना आहे. हा भारताच्या विरोधात जाणीवपूर्वक चालवण्यात येणार्या प्रचाराचा भाग आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या खोट्या बातम्या पसरवण्यासाठी ‘इंटरसेप्ट’ने या आधीही अशा बातम्या प्रसिद्ध केल्या आहे. हे वृत्त ज्याने लिहिले आहे, त्याचे आणि पाकच्या गुप्तचर यंत्रणांचे संबंध स्पष्टपणे दिसत आहेत.
Our response to media queries on reports of MEA “secret memo” in April 2023:https://t.co/LcHTl5HUpf pic.twitter.com/7ilEyqkVDX
— Arindam Bagchi (@MEAIndia) December 10, 2023
मुर्तजा हुसेन आणि रयान ग्रिम यांनी दिले वृत्त !
‘इंटरसेप्ट’मधील वृत्त मुर्तजा हुसेन आणि रयान ग्रिम यांनी एकत्रित लिहिले आहे. मुर्तजा यांची ‘इंटरसेप्ट’मधील १० पैकी ५ वृत्ते भारत आणि खलिस्तान यांच्याशी संबंधित आहेत. यातील एक वृत्त पाकच्या गुप्तचर विभागाचा संदर्भ देत देण्यात आले आहे. यात ‘भारताने दुसर्या देशांमध्ये शीख आणि काश्मिरी कार्यकर्ते यांनी ठार मारले’, असा आरोप करण्यात आला आहे.