अहिल्यानगर – एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणी संतप्त जमावाने मारहाण केल्याने अण्णा वैद्य याचा मृत्यू झाला आहे. अण्णा वैद्य हा राज्यभर गाजलेल्या महिलांच्या हत्येच्या प्रकरणात शिक्षा भोगलेला आणि काही गुन्ह्यांत निर्दोष मुक्त झाला होता. अकोले तालुक्यातील सुगाव येथे अण्णा वैद्य रहात होता. मच्छिंद्र उपाख्य अण्णा वैद्य हा चार साखळी हत्येतील आरोपी होता. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
राज्यभरात वर्ष २००७ मध्ये ४ महिलांची हत्या करून त्यांना शेतात पुरून ठेवल्याचा आरोप अण्णा वैद्य याच्यावर होता. संगमनेर येथील एका महिलेची हत्या करून पुरावा नष्ट केल्याच्या आरोपावरून संगमनेरच्या न्यायालयाने वैद्य याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयात नंतर त्याची निर्दोष मुक्तता झाल्यावर तो सुगाव येथे रहात होता. १० डिसेंबरला सायंकाळी अल्पवयीन मुलीची त्याने छेड काढली आणि त्यामुळे संतप्त जमावाने त्यास मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.