|
कोपनहेगन (डेन्मार्क) – युरोपीय देश डेन्मार्कमध्ये सार्वजनिक ठिकाणी कुराण जाळण्याच्या कृत्यावर बंदी घालण्यात आली आहे. ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मुसलमान देशांशी वाढत असलेला तणाव अल्प करण्यासाठी डेन्मार्क संसदेने हा कायदा संमत केला. कायदा मंत्री पीटर हमलगार्ड म्हणाले की, जुलै २०२३ नंतर ५०० हून अधिक आंदोलने झाली, ज्यांमध्ये कुराण अथवा इस्लामचा ध्वज जाळण्यात आला. या कृत्यांमुळे डेन्मार्कचे अन्य देशांशी असलेले संबंध, हित आणि संरक्षण यांना निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा कायदा करण्यात आला आहे.
१७९ पैकी ९४ खासदारांचा कायद्याला पाठिंबा !
डेन्मार्कच्या संसदेत ५ तास झालेल्या चर्चेनंतर १७९ पैकी ९४ खासदारांनी, म्हणजे ५२ टक्के खासदारांनी या कायद्याला पाठिंबा दर्शवत त्याच्या बाजूने, तर ७७ खासदारांनी कायद्याच्या विरोधात मतदान केले. सरकारने सांगितले की, नव्या कायद्यानुसार कुराण अथवा कोणताही धार्मिक ग्रंथ फाडणे, जाळणे, सार्वजनिक स्तरावर त्याचा अवमान करणे अथवा अशा कृत्याचा व्हिडिओ बनवून तो प्रसारित, करणे यांवर बंदी असणार आहे.
जुलै २०२३ मध्ये डेन्मार्कमध्ये कुराण जाळण्याच्या घटनेवरून इराकमधील डेन्मार्कच्या दूतावासावर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता. यावरून डेन्मार्कने त्याच्या सीमांवरील सुरक्षा वाढवली होती. यासह सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, तुर्कीये, पाकिस्तान यांच्यासह अनेक मुसलमान देशांनी डेन्मार्कवर टीका केली होती.
असा कायदा करणे, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला ! – विरोधी खासदारांचे मत
‘डेन्मार्क डेमोक्रॅट्स पार्टी’चे नेते इंगर स्टोजबर्ग म्हणाले की, असा कायदा झाल्याने इतिहासात डेन्मार्कची निंदा केली जाईल. प्रश्न असा आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंदी आपण निश्चित केली आहे कि बाहेरील शक्तींनी असे करण्यास आपल्याला भाग पाडले आहे ? हा कायदा मोडणार्याला २ वर्षांच्या कारागृहवासासह आर्थिक दंडही भरावा लागणार आहे. शेजारील देश स्विडनमध्येही असा कायदा केला जाण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.