पणजी, ७ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात मागील ४ आर्थिक वर्षांत १ सहस्र ५९९ कोटी ४२ लाख रुपयांचा ‘वस्तू आणि सेवा कर’ (‘जी.एस्.टी.’) बुडवल्याचे उघडकीस आले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. यांतील केवळ १९८ कोटी रुपये वसूल करण्यास केंद्रीय अर्थ खात्याला यश आले आहे. कर बुडवल्याबद्दल मागील ४ वर्षांत एकाही व्यक्तीला कह्यात घेण्यात आलेले नाही.
गोव्यात वर्ष २०१९-२० मध्ये सर्वाधिक १ सहस्र ३३३ कोटी ३७ लाख रुपये, वर्ष २०२०-२१ मध्ये ७४ कोटी २३ लाख रुपये, वर्ष २०२१-२२ मध्ये १४७ कोटी ९ लाख रुपये, वर्ष २०२२-२३ मध्ये ४३ कोटी ९२ लाख रुपये ‘वस्तू आणि सेवा कर’ बुडवण्यात आला. त्याचप्रमाणे बुडवलेल्या करापैकी वर्ष २०१९-२० मध्ये केवळ ४ टक्के, वर्ष २०२०-२१ मध्ये ८२ टक्के, वर्ष २०२१-२२ मध्ये २५.११ टक्के आणि वर्ष २०२२-२३ मध्ये ५६.७३ टक्के कर वसूल करण्यात आला. राज्यात गेल्या काही वर्षात ‘वस्तू आणि सेवा कर’ संकलनात वाढ झालेली आहे. मागील ८ मासांत ‘वस्तू आणि सेवा करा’च्या माध्यमातून सुमारे २ सहस्र ६०० कोटी रुपये महसूल मिळाला आहे.
‘वस्तू आणि सेवा कर’ मंडळाकडून मंत्रीगटाची फेररचना
पणजी – ‘वस्तू आणि सेवा कर’ मंडळाने दर निश्चित करण्यासाठी मंत्रीगटाची फेररचना केली आहे. गोव्याचे वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांना पुन्हा स्थान देतांना त्यांना दुसर्या क्रमांकावर बढती देण्यात आलेली आहे. नवीन मंत्रीगटात निमंत्रकपदी उत्तरप्रदेशचे वित्तमंत्री सुरेश कुमार खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच या गटात गोव्याचे मंत्री मावीन गुदिन्हो यांच्यासह एकूण ६ सदस्य आहेत.