तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – श्री तुळजाभवानीदेवीचा १ किलो वजनाचा प्राचीन सोन्याचा मुकूट गायब असल्याचे दागिने तपासणी समितीस आढळले आहेत. तसा अहवाल त्यांनी जिल्हाधिकार्यांना सादर केला आहे. देवीच्या नित्योपचारासाठी वापरण्यात येणारे सोन्या-चांदीचे दागिने तिजोरीतून गायब असल्याचेही उघडकीस आले आहे. श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरातील प्राचीन दागिन्यांची तपासणी करण्यासाठी १६ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने २ मासांपूर्वी अहवाल सादर केला आहे.
१. श्री तुळजाभवानीदेवीचे मौल्यवान दागिने एकूण ७ डब्यांत ठेवण्यात आलेले आहेत. डबा क्रमांक ३ मध्ये देवीचा प्राचीन सोन्याचा मुकूट पालटून त्या ठिकाणी दुसरा मुकूट ठेवला असल्याची नोंद समितीने त्यांच्या अहवालात केली आहे, तसेच डब्यातील एकूण १६ अलंकारांतील मंगळसूत्र, नेत्रजोडवी, माणिकमोती हे ३ दुर्मिळ आणि मौल्यवान दागिने गहाळ झाले आहेत.
२. डबा क्रमांक ५ मधील एकूण १० अलंकारांतील १ अलंकार गायब, तर अन्य अलंकारांच्या वजनात तफावत असल्याचे स्पष्टपणे नोंदवले आहे. डबा क्रमांक ७ मधील एकूण ३२ दुर्मिळ अलंकारातील देवीचा चांदीचा पुरातन मुकुट गायब आहे, तर अन्य ३१ अलंकारांच्या वजनातही तफावत असल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे.
३. या प्रकरणी मुख्यमंत्री, विधी आणि न्याय विभाग, धर्मादाय आयुक्त यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी सांगितले.
दोषी ठरवण्यासाठी स्वतंत्र समिती ! – सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी, धाराशिव
दागिने तपासणी समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये अनेक अनागोंदी कारभार असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणात दोषी कोण ? हे ठरवण्यासाठी एक स्वतंत्र समिती काम करत आहे. त्या समितीचा अहवाल २ दिवसांत येईल. त्यानंतर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया हाती घ्यायची का, यावर निर्णय घेतला जाईल.
संपादकीय भूमिका :
|