वीजदेयक भरण्यास सांगून अधिकोषाच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक !

दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांची वाढती उदाहरणे पहाता सर्व नागरिकांनीच सतर्क रहाणे आवश्यक !

मुंबई – गिरगाव येथे एका महिलेला ‘चालू मासाचे वीजदेयक भरले नसून रात्री वीजपुरवठा बंद होईल’, असा संदेश भ्रमणभाषवर आला आणि मिळालेल्या सूचनेनुसार संबंधित ‘ॲप’ डाऊनलोड केल्यानंतर तिची फसवणूक झाली आहे.

या संदेशात एक भ्रमणभाष क्रमांकही देणयात आला होता. त्यावर बोलणार्‍या व्यक्तीने तिचे नाव देवेश जोशी सांगितले. संबंधित आरोपीने ‘इलेक्ट्रीक बिल साईन’ आणि ‘इलेक्ट्रीक बिल अपडेट’ हे दोन मोबाइल ॲप डॉऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यातून ऑनलाईन व्यवहार होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी  पडताळले असता त्यांच्या खात्यातून परस्पर २ लाख रुपये काढल्याचे लक्षात आले. या प्रकरणी डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.