विघ्नहर गणपति मंदिराच्या (ओझर) संकेतस्थळाचे अनावरण !

श्री विघ्नहर गणपति मंदिराच्या संकेतस्थळाचे अनावरण

महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेच्या व्यासपिठावर ३ डिसेंबर या दिवशी ओझर येथील श्री विघ्नहर गणपति मंदिराच्या ‘https://shrivighnaharganapatiozar.org/’ या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्या हस्ते संकेतस्थळाच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण करून संकेतस्थळाचे अनावरण केले. या वेळी व्यासपिठावर श्री विघ्नहर गणपति मंदिराचे (ओझर) अध्यक्ष श्री. गणेश कवडे, विश्‍वस्त सर्वश्री बबनराव मांडे, आनंदराव मांडे,  श्रीराम पंडित, ओझर गाव १ च्या सरपंच सौ. राजश्री कवडे, ओझर गाव २ च्या सरपंच सौ. तारामती कर्डक, सचिव श्री. दशरथ मांडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. दिलीप कवडे, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे सचिव श्री. सत्यशील शेरकर, श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थानचे सचिव श्री. सुरेश कौदरे, श्रीक्षेत्र लेण्याद्री गणपति देवस्थानचे अध्यक्ष श्री. जितेंद्र बिडवई हे उपस्थित होते. या संकेतस्थळावर भाविकांना मंदिरातील दैनंदिन पूजाउपचार, देवस्थानची धार्मिक-सामाजिक कार्याची माहिती, उत्सवांची माहिती उपलब्ध होणार आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी संकेतस्थळामुळे देश-विदेशातील भक्तांना मंदिरातील धार्मिक कार्याची माहिती मिळू शकेल, असे मत व्यक्त केले. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी या वेळी आभार प्रदर्शन केले.

देवस्थानची व्यवस्था ‘हिंदु राष्ट्रातील आदर्श मंदिराप्रमाणे’ ! – विष्णु शंकर जैन

मंदिरामध्ये दिव्य अनुभूती येते. ओझर हे सिद्ध आणि दिव्य क्षेत्र आहे. ही दिव्यता मंदिराच्या परिसरातही जाणवते. श्री गणेशाचे स्वरूप मंदिराच्या चारही बाजूला पसरले आहे. हिंदु राष्ट्रातील एक आदर्श मंदिर म्हणून ओझर येथील श्री विघ्नहर गणपति मंदिराचा आदर्श घेता येईल, असे मत अधिवक्ता विष्णु शंकर यांनी व्यक्त केले.