मनगटाचा अस्थीभंग झाल्यावर सकारात्मक आणि भावस्थितीत राहून अखंड गुरुकृपा अनुभवणार्‍या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या शिवमोग्गा (कर्नाटक) येथील सौ. स्मिता कानडे (वय ५६ वर्षे) !

सौ. स्मिता कानडे

१. अडखळून पडल्याने डाव्या हाताच्या मनगटाचा अस्थीभंग होणे, तरीही मन शांत असणे

‘१३.११.२०२२ या दिवशी मी शिवमोग्गाहून हुब्बळ्ळीला आले आणि हुब्बळ्ळी सेवाकेंद्रात जाण्यासाठी रिक्शाकडे जातांना अडखळून पडले. तशीच उठून मी माझे सामान उचलून रिक्शामध्ये ठेवले आणि सेवाकेंद्रात गेले. तोपर्यंत माझे मनगट आणि बोटे यांना पुष्कळ सूज आली. ते पाहून ‘माझ्या मनगटाचा अस्थीभंग झाला आहे’, हे माझ्या लक्षात आले, तरीही परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने माझे मन शांत होते.

२. ‘अस्थीभंग झाला आहे’, हे लक्षात येऊनही मन सकारात्मक असणे

१७.११.२०२२ या दिवसापासून रामनाथी (गोवा) येथे एक शिबिर होते. माझ्या मनामध्ये ‘भगवंत मला २ दिवसांत बरे करणार असून मी रामनाथी येथील शिबिराला जाणार आहे’, असे सकारात्मक विचार होते.

३. हुब्बळ्ळी सेवाकेंद्रात गेल्यावर संत आणि साधक यांनी प्रेमाने दिलेला आधार !

‘मी पडले आहे’, असे समजल्यावर हुब्बळ्ळी येथील सौ. विदुला हळदीपूर आणि सौ. वंदना भोज यांनी सेवाकेंद्रात येऊन ‘बँडेज पट्टी’ने माझा हात बांधला अन् माझी प्रेमाने विचारपूस करून मला आधार दिला. तेव्हा गुरुदेव सांगत असलेल्या प्रथमोपचार प्रशिक्षणाचे महत्त्व माझ्या लक्षात आले. पू. रमानंदअण्णा (सनातनचे ७५ वे (समष्टी) संत)) यांनीही लगेच दूरभाष करून माझी विचारपूस केली आणि मला नामजपादी उपाय सांगितले. त्यांनी लगेच मला साहाय्य करण्यासाठी साधकांचे नियोजनही केले. मी शिबिराला गोव्याला जाईपर्यंत पू. रमानंदअण्णा प्रतिदिन भ्रमणभाष करून माझी विचारपूस करत होते.

४. रविवारची सुटी असतांनाही पू. रमानंदअण्णांच्या प्रीतीमुळे सनातन संस्थेशी जोडल्या गेलेल्या वैद्यांनी सेवाकेंद्रात येऊन प्रथमोपचार केल्यावर ‘ही गुरुकृपा आहे’, याची जाणीव होणे

मी रविवारी पडले असल्याने त्या दिवशी आधुनिक वैद्य उपलब्ध होणार नव्हते. ‘मला सोमवारी उपचार मिळणार आहेत’, हे लक्षात आल्यावरही माझे मन सकारात्मक होते. रविवार असूनही पू. रमानंदअण्णांच्या प्रीतीमुळे सनातन संस्थेशी जोडल्या गेलेल्या एक आयुर्वेदाच्या वैद्यांनी सेवाकेंद्रात येऊन माझ्या मनगटावर प्रथमोपचार केले. त्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त केल्यावर ते म्हणाले, ‘‘साधकांचा सहवास मिळाल्याने मलाही आनंद झाला.’’ या प्रसंगातून  ‘गुरुदेव माझी किती काळजी घेत आहेत’, याची मला जाणीव झाली.

५. अनुभूती

५ अ. आधुनिक वैद्यांशी अध्यात्मावर चर्चा केल्यावर ‘सत्संग’ हा वेदना शमन करणारा आहे’, याची आलेली अनुभूती ! : सोमवारी आधुनिक वैद्यांकडे (अस्थीरोग तज्ञांकडे (ऑर्थोपेडिक सर्जनकडे)) गेल्यावर त्यांनी मनगटाची ‘क्ष’ किरण (एक्स-रे) तपासणी केली. तो अहवाल पाहून आधुनिक वैद्यांनी मला आधार दिला आणि म्हणाले, ‘‘केवळ भूल देऊन हाड बसवावे लागेल.’’ ते आधुनिक वैद्य पुष्कळ सात्त्विक आणि आध्यात्मिक होते. भूलतज्ञांना यायला थोडा वेळ होता. ते येईपर्यंत आधुनिक वैद्यांनी माझ्याशी अध्यात्मावर चर्चा केली. त्यांनी मला त्यांच्या क्षेत्रातील त्यांचे अनुभव सांगितले. त्यांच्याशी बोलतांना ‘माझा अस्थीभंग झाला आहे’, हे मी विसरूनच गेले. तेव्हा ‘तो सत्संगाचा परिणाम असून ‘सत्संग’ वेदना शमन करणारा आहे’, असे मला वाटले.

भूलतज्ञ आल्यावर त्यांनी मला भूल दिली. आधुनिक वैद्यांनी माझ्या मनगटाचे हाड बसवले आणि ‘प्लास्टर’ घातले.

५ आ. अस्थीभंग आणि नंतर शस्त्रकर्म झाल्यावरही गुरुकृपेने अतिशय अल्प वेदना होणे : मी पडल्यावर माझे मनगट आणि बोटे यांवर पुष्कळ प्रमाणात सूज होती. सेवाकेंद्रात माझ्या मनगटावर प्राथमिक उपचार करणार्‍या आयुर्वेदाच्या वैद्यांना ‘मला पुष्कळ वेदना होत असतील’, असे वाटले होते; पण गुरुकृपेने तेव्हा आणि मनगटाचे शस्त्रकर्म झाल्यावरही मला होणार्‍या वेदना अतिशय अल्प होत्या. त्याचे वैद्य आणि आधुनिक वैद्य दोघांनाही पुष्कळ आश्चर्य वाटले होते.

६. रुग्णालयात असतांना ठेवलेला भाव !

अ. रुग्णालयात आधुनिक वैद्यांच्या (अस्थीरोग तज्ञांच्या) गुरूंचे अतिशय तेजस्वी आणि सुहास्यवदन असलेले छायाचित्र होते. त्यांच्या हातामध्ये कमंडलू होता. ‘ते मला त्यांच्या कमंडलूमधील तीर्थ देत आहेत.’

आ. आधुनिक वैद्यांच्या कक्षात जातांना ‘मी गुरुदेवांच्या कक्षात जात आहे.’

इ. ‘क्ष’ किरण तपासणीसाठी जातांना ‘गुरुदेवांच्या कृपेने ‘क्ष’ किरण तपासणीच्या यंत्रातून माझ्या हातावर चैतन्याचे प्रक्षेपण होणार आहे.’

ई. शस्त्रकर्मकक्षात जातांना गुरुदेव माझ्या समवेत आहेत.

उ. शस्त्रकर्मानंतर माझी भूल पूर्ण उतरली नव्हती. मी अर्धवट गुंगीत असतांना मला ‘मी आणि माझ्या समवेत आलेली साधिका आम्हा दोघींच्या ठिकाणी मला देवीचे रूप दिसत होते. मला सर्वत्र सोनेरी प्रकाश आणि सोन्याची सुंदर कलाकुसर केलेल्या भिंतींची भव्य दालने दिसत होती. त्या भिंतींवर फुलांच्या सुंदर माळा होत्या. ‘मला मी दुसर्‍या लोकात आहे’, असे वाटत होते. तिथे माझी दृष्टी गुरुदेवांना शोधत होती. तेव्हा गुरुकृपेने माझ्या मनात विचार आला, ‘जे जे सुंदर, भव्य-दिव्य आणि परिपूर्ण आहे, ते ते प.पू. डॉक्टरच आहेत. ते सर्वत्र आहेतच. ते माझ्या हृदयातही आहेत. ते नाहीत, अशी जगात एकही जागा नाही.’

७. कृतज्ञता

मी माझ्या प्रारब्धानुसार पडले; पण गुरुदेवांच्या कृपेने मला होणार्‍या वेदना पुष्कळ अल्प होत्या. त्याही स्थितीत मी गुरुकृपेने स्थिर आणि आनंदी होते. रुग्णालयात जातांना भगवंताने मला विचार दिला, ‘प्रारब्ध आनंदाने आणि भावाच्या स्थितीत राहून भोगूया.’ भगवंतानेच माझ्याकडून भावाचे प्रयत्न करून घेतले. यासाठी भगवंत आणि गुरुदेव यांच्या चरणी कितीही वेळा कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. अखंड कृतज्ञ आहे !’

– सौ. स्मिता कानडे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५६ वर्षे), शिवमोग्गा, कर्नाटक. (८.१२.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक