सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासंदर्भात सनातन संस्थेच्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांचे अंतर्मन जाणून सर्वांना दर्शनासाठी बोलावले आहे’, असे लक्षात येणे

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव आहे आणि त्यासाठी त्यांना गोव्याला यायचे आहे’, हे कळल्यावर सर्वांचा भाव जागृत होऊन ‘हा ‘जन्मोत्सव भावसोहळा’ वेगळा असेल’, असे वाटून सर्वांना कृतज्ञता वाटत होती. मागील वर्षी (वर्ष २०२२ मध्ये) ‘जन्मोत्सव (रथोत्सव) सोहळा बघायला मिळायला पाहिजे’, असे माझ्या अंतर्मनात होते आणि ‘गुरुदेवांनी साधकांचे अंतर्मन जाणून आम्हा सर्वांना दर्शनाला बोलावले आहे’, असे माझ्या लक्षात आले.

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार

२. साधक जन्मोत्सवाला येण्याचे नियोजन करत असतांना सर्व साधकांचा भाव अणि उत्साह बघून मला सतत भावावस्था अनुभवता येऊन कृतज्ञता वाटत होती.

३. ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या आदल्या दिवशी रंगीत तालिम पहाण्यासाठी मैदानात पोचल्यावर जाणवलेली सूत्रे, आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

३ अ. शिकायला मिळालेली सूत्रे

१. रंगीत तालमीची सिद्धता चालू असतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोन्ही देवी ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमाचे नियोजन परिपूर्ण होण्यासाठी उन्हामध्ये उभ्या राहून मार्गदर्शन करत होत्या. ‘प्रत्यक्ष देवी माऊली सामान्यांप्रमाणे सहजतेने गुरुसेवा करत आहेत’, हे पाहून मलाही ‘पुष्कळ गुरुसेवा करायला पाहिजे. मी अजून पुष्कळ न्यून पडत आहे’, याची जाणीव झाली.

२. ‘ब्रह्मोत्सवाच्या आदल्या दिवशी प्रत्यक्ष रंगीत तालमीविषयीचे दैवी नियोजन मला पहायला आणि शिकायला मिळाले’, त्याबद्दल कृतज्ञता वाटत होती आणि ‘प्रत्येक गोष्टीत आपण कसे लक्ष घालायला हवे ?’ हे शिकायला मिळाले.

३ आ. जाणवलेली सूत्रे

१. कार्यक्रम स्थळाचे भव्य नियोजन बघून ‘आपत्काळापूर्वी सर्व साधक, संत आणि सद्गुरु यांना तिन्ही मोक्षगुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) हृदयात सामावून घेत आहेत’, असे मला जाणवले.

२. रथाची परिक्रमा चालू असतांना रथातून तिन्ही गुरु संपूर्ण ब्रह्मांडाला चैतन्य देत असून, ब्रह्मांडातील प्रत्येक साधकाभोवती संरक्षककवच निर्माण करत आहेत’, असे मला जाणवले.

३ इ. आलेल्या अनुभूती

१. जन्मोत्सव सोहळ्याच्या आदल्या दिवशी रंगीत तालिम पहाण्यासाठी सोहळ्याच्या मैदानात पोचल्यावर मला तेथे दैवी सुगंध येत होता. ‘मी दिव्य उच्च लोकात, म्हणजे विष्णुलोकात पोचले आहे’, असे वाटून मला पुष्कळ आनंद होत होता. ‘माझे शरीर हलके झाले आहे’, असे जाणवत होते.

२. निळ्या रंगाचे व्यासपिठ बघितल्यावर ‘आकाश आणि व्यासपिठ एकत्र झाले आहे’, असे मला जाणवले.

३. कार्यक्रम स्थळी पोचल्यावर आकाशातून ‘ॐ’ चा  दैवी नाद ऐकू येत होता.

४. ‘सुवर्ण रथ कसा बनवला ?’ याविषयी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ माहिती सांगत असतांना त्या देहभान विसरून गुरुमहिमा सांगत होत्या. त्यामुळे उपस्थित सर्व संत आणि सद्गुरु यांचा भाव जागृत होत होता.

५. त्रासदायक अनुभूती

रथासंदर्भात माहिती जाणून घेत असतांना माझ्या दोन्ही पायांवर तळपायांपासून गुडघ्यांपर्यंत किडे चावत होते. त्यामुळे माझ्या पायांवर लाल मोठे डाग (गांध्या) उमटले. तेव्हा ‘रथाविषयीची माहिती मी ऐकू नये, यासाठी अनिष्ट शक्तींनी आक्रमण केले’, असे मला जाणवले. सद्गुरु गाडगीळकाकांनी (सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी) नामजपादी उपाय दिल्यानंतर २ दिवसांनी तो त्रास उणावला.

६. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

६ अ. जाणवलेली सूत्रे

१. सर्व साधकांच्या चेहर्‍यावरील भाव बघून ‘गुरुदेव साधकांना घेऊन आले’, असे जाणवत होते.

२. रथामध्ये तिन्ही मोक्षगुरु विराजमान होऊन गुरूंचा रथ प्रांगणात येत असतांना सर्वांचे डोळे आणि मन रथाकडे केंद्रित झाले होते. सर्वजण हात उंचावून नमस्कार करत होते.

३. त्या वेळी ‘तिन्ही गुरु सर्व साधकांच्या हृदयात विराजमान झाले आहेत. त्यांनी आपत्काळापूर्वी सर्वांना कृपाशीर्वाद देऊन चैतन्य, बळ आणि ऊर्जा पुरवली आहे. अखंड सेवारत रहाण्याचा आशीर्वाद दिला आहे आणि हृदयात दृढ भावभक्ती निर्माण केली आहे’, असे मला जाणवले.

४. या ब्रह्मोत्सवासाठी साधकांनी केलेले अथक प्रयत्न आणि परिपूर्ण सेवा बघून ‘परम पूज्य गुरुदेवांनी किती सुंदर साधक घडवले आहेत’, याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

५. ‘तिन्ही गुरूंचे स्मितहास्य सर्वांच्या हृदयात कोरले गेले आणि तेच सूक्ष्मरूपाने सर्वांच्या स्मरणात राहून पुढील काळात आनंद देणार आहे’, असे मला जाणवले.

६ आ. चांगल्या अनुभूती

१. कार्यक्रम स्थळी पोचल्यावर सर्व साधकांना भावस्थितीत बघून ‘गुरुदेवांच्या विराट रूपाचे दर्शन होत आहे’, असे जाणवले आणि माझी भावजागृती झाली.

२. ‘उच्च लोकांतील देवी-देवता, ऋषिमुनी, सर्वजण रथावर पुष्पवृष्टी करून दर्शन घेत आहेत’, असे मला जाणवत होते.

३. साधक तिन्ही मोक्षगुरूंचा रथ ओढत असतांना ‘मीही रथ ओढत आहे’, असे मला वाटत होते. तेव्हा ही रथ ओढण्याची सेवा मिळल्याविषयी कृतज्ञता वाटून माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी उत्तम शिष्य होण्यासाठी प्रार्थना होत होती. ‘तुम्हीच ही रथ ओढण्याची सेवा दिलीत. तुम्हाला अपेक्षित अशी सेवा करून घ्या आणि तुम्हीच तुम्हाला अपेक्षित असे आम्हाला घडवा. आम्हाला अखंड शिष्यभावात रहाता येऊ द्या’, अशी प्रार्थना माझ्याकडून होत होती.

या ब्रह्मोत्सवाच्या माध्यमातून तिन्ही मोक्षगुरूंनी आम्हा सर्वांना आनंद दिला, त्याबद्दल कोटीश: कृतज्ञता !’

– पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार, फोंडा, गोवा. (१७.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक