संस्कृत भाषेची थोरवी किंवा महती गाणारे आजच्या काळात अगदीच तुरळक आढळतील; कारण ती बहुतांश प्रमाणात लुप्त होत चाललेली भाषा आहे. असे असले, तरी ‘संस्कृत भाषा थोडीतरी आली पाहिजे’, असे एक मत कला विश्वातून नुकतेच मांडण्यात आले आहे. हे मत मांडले आहे अभिनेत्री ईशा तलवार यांनी ! सध्या कोणत्याही क्षेत्रात वर्चस्व आहे ते इंग्रजी भाषेचे ! त्यामुळे मराठी, हिंदी, संस्कृत या भाषांना सर्रास डावलले जाते. मराठी भाषेलाही उतरती कळा लागली आहे. संस्कृत भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. असे असतांना एका अभिनेत्रीने संस्कृतला महत्त्व देणारे केलेले विधान निश्चितच स्तुत्य आणि अनुकरणीय आहे. एखाद्या कलाकाराने एखादे मत मांडले की, त्याला वजन प्राप्त होते. अभिनेत्री ईशा यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. ईशा यांनी केवळ ‘संस्कृत’ असा उल्लेख न करता तिला ‘देवभाषा’ असेही संबोधले आहे. त्यांना संस्कृतचे मूल्य समजले आहे; पण अन्य अभिनेते किंवा अभिनेत्री यांना संस्कृतची महती कधी लक्षात येणार ? ‘आपणच आपल्या भाषांविषयी उदासीन आहोत’, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनीही नुकतेच व्यक्त केले होते. ते म्हणाले, ‘‘राज्यपाल म्हणून मला अनेक देशांचे राजदूत आणि वाणिज्यदूत भेटायला येतात. काहींना हिंदी भाषा अवगत असते. अनेक देशांमधील विद्यापिठांमध्ये हिंदी भाषा विभाग कार्यरत असल्याचे त्यांच्याकडून समजते. आपल्याकडे मात्र हिंदी चित्रपट कलाकार इंग्रजीतच बोलतात.’’ सगळीकडे भाषेची दैन्यावस्था सारखीच !
अभिनेत्री ईशा यांना जे लक्षात आले, ते त्यांनी मांडले; पण केवळ तितक्यावर समाधान मानून उपयोग होणार नाही; कारण संस्कृतला वाचवणे आणि तिला पुनर्वैभव प्राप्त करून देणे, हे भाषाप्रेमींसाठी मोठे युद्धच आहे. ईशा यांनी त्यांच्या क्षेत्रातील सर्वच मंडळींचे संस्कृतविषयी प्रबोधन करायला हवे. कलाकारांनी संस्कृतचे समर्थन केले, तर अवघ्या देशात संस्कृतचे सूर आळवले जातील, यात शंका नाही. स्वार्थ आणि पैसा यांच्या विश्वात वावरणार्या कलाकारांनी भाषाभिमान बाळगत अभिनेत्री ईशा यांच्याप्रमाणे प्रयत्न करावेत !
संस्कृतची महानता !
सध्याची पिढी चित्रपट कलाकारांना आदर्श मानते; पण हे कलाकारच जर इंग्रजाळलेले असतील, तर नव्या पिढीमध्ये भारतीय संस्कार आणि मातृभाषेचे महत्त्व कोण रुजवणार ? ‘संस्कृत किंवा मराठी भाषेत बोलणे हा मागासलेपणा आहे’, अशी मानसिकता आज सर्वत्र निर्माण झाली आहे. ‘तुम्ही इंग्रजी बोललात, तर सर्वश्रेष्ठ’, असा तर्क लावला जात असल्याने लहान मूल बोलायला शिकत असतांनाच त्याच्यावर इंग्रजीचा मारा केला जातो. अर्थात् या बुद्धीमानतेला मर्यादाच आहेत. जे ज्ञानभांडार संस्कृत किंवा मराठी या भाषांमध्ये उपलब्ध आहे, ते इंग्रजीत नाही. संस्कृतमध्ये ‘स्त्री’ या शब्दाला नारी, अर्धांगिनी, वामांगिनी, वामा, योषिता, असे अनेक पर्यायी शब्द आहेत; पण इंग्रजीतील ‘वूमन’ शब्दाला पर्यायी शब्द आहे का ? नाही ना ! संस्कृत भाषा ही हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, या भाषांची जननी आहे. संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक, देवभाषा, अमरभारती, गीर्वाणवाणी इतकी नावे आहेत. इंग्रजीला पर्यायी नाव कोणते ? नाही ना ! संस्कृत भाषेच्या शब्दभांडाराची माहिती घ्यायला एक आयुष्यही अपुरे पडेल. ही आहे संस्कृतची महानता आणि विद्वता ! संस्कृतचा अवलंब करणाराच खर्या अर्थाने प्रज्ञावंत आणि बुद्धीवंत होऊ शकेल, यात शंका नाही.
संस्कृतविषयी कृतघ्नपणा !
नोकरी-धंदा, व्यवसाय करणे, भ्रमणभाष पहाणे यांच्या धावपळीत अनेक घरांमध्ये दिवेलागणी होत नाही. तीच होत नसेल, तर दिव्यासमोर बसून म्हटले जाणारे श्लोक आणि प्रार्थना तरी कुठून ऐकू येणार ? चित्रपटांतील गाणी अगदी तोंडपाठ; पण ‘वदनी कवळ घेता’ म्हणण्यास सांगितल्यावर ‘म्हणजे काय असते ?’ इथपासून प्रारंभ होतो. अरबी, फारसी या भाषा लगेचच तोंडी येतात. आजकाल तर ‘टपोरी’ नावाच्याही भाषेचा उदय झाला आहे. याला गुंडगिरी, गुन्हेगारी जगतातील चित्रपट कारणीभूत आहेत. टपोरी भाषेचा वापर सहज संवादासाठीही सर्रास केला जातो, हे किळसवाणेच आहे; पण ‘तुम्ही टपोरी बोलाल, तरच तुमचा आजच्या जगात निभाव लागू शकतो’, असे चित्र निर्माण केले जाते. जी भाषा सौंदर्याने नटलेली आहे, चैतन्याने ओतप्रोत भरलेली आहे, मोक्षप्रदायिनी आहे आणि मनःशांती देणारी आहे, तिला दुर्दैवाने लाथाडून मृतवत् केले जात आहे. हा कृतघ्नपणाच होय ! जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, ‘‘भारताची सर्वांत मोठी संपत्ती कोणती ? असे कुणी विचारल्यास मी ठामपणे उत्तर देईन की, ती आहे संस्कृत भाषा आणि वाङ्मय !’’ सत्य हे की, संस्कृत भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर असतांना नेहरूंनी काहीच प्रयत्न केले नाहीत. याला म्हणतात ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात !’ संस्कृत भाषेचे अस्तित्व इंग्रजांनी धूर्तपणे मिटवण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात संस्कृतला पूर्णपणेच संपवू पाहिले जात आहेत. हे थांबवायला हवे !
सौंदर्याने नटलेल्या आणि चैतन्याने ओतप्रोत भरलेल्या संस्कृत भाषेला लाथाडणे, हा कृतघ्नपणाच होय ! |