संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी शासनाकडून ४८ कोटी रुपयांचे वितरण !

प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार आणि शिवकालीन शस्त्रांचे जतन होणार !

मुंबई, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील संरक्षित स्मारकांचे जतन आणि संवर्धन यांसाठी वर्ष २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये राज्यशासनाने ९० कोटी रुपये इतका निधी संमत केला होता. त्यापैकी ४८ कोटी ५१ लाख ३ सहस्र २२ रुपयांचे शासनाकडून वाटप करण्यात आले आहे. यातून शिवकालीन शस्त्रे कह्यात घेणे, त्यांचे जतन करणे, प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार, राज्य संरक्षित स्मारकांचे संवर्धन करणे आदी १७ कामे करण्यात येणार आहेत.

यामध्ये राज्यातील १३ राज्य संग्रहालयांतील शिवकालीन शस्त्रांचे जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे. यासाठी ४ कोटी ४६ लाख ७६ सहस्र २८४ रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे. पुरातत्व विभागाच्या नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे या विभागांतील राज्य संरक्षित स्मारकांवर माहिती फलक लावणे, आवश्यक सूचना लावणे आदी कामांसाठी निधी संमत करण्यात आला आहे. इंग्लंड येथून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठीच्या प्रवासासाठीही यामध्ये ५० लाख १४ सहस्र ५५० रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शासनाकडून ५० कोटी रुपयांचे स्वतंत्रपणे प्रावधान करण्यात आले आहे. या सर्व कामांसाठी २३ नोव्हेंबर या दिवशी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने शासन आदेश प्रसारित केला आहे.

संग्रामदुर्ग आणि शिवडी गडाची दुरुस्ती होणार !


राज्य संरक्षित स्मारक असलेल्या शिवडी (मुंबई) आणि चाकण (खेड) येथील संग्रामदुर्ग या गडाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. शिवडी किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी ९६ लाख ४ सहस्र ८११ रुपये, तर संग्रामदुर्गाच्या दुरुस्तीसाठी २ कोटी ८३ लाख २६ सहस्र ३२१ रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे.

पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार आणि प्राचीन धार्मिक स्थळांचे संवर्धन !

चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड येथील श्री विष्णु मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ३ कोटी २० लाख ८६ सहस्र ९७९ रुपये, बाबूपेठ येथील श्री महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी १ कोटी ५५ लाख ८६ सहस्र ८१ रुपये, बारामती (पुणे) येथील लोणी भापकर येथील श्री महादेव मंदिर आणि श्री दत्त मंदिर यांच्या जीर्णोद्धारसाठी २ कोटी ५१ लाख ५० सहस्र ९९६ रुपये, सोलापूर जिल्ह्यातील श्री मुरलीधर मंदिर अन् हत्तरसंगकुंडल येथील श्री संगमेश्‍वर मंदिर यांच्या जीर्णोद्धारासाठी १ कोटी ४३ लाख १ सहस्र ८१० रुपये, तर गोंदिया जिल्ह्यातील राज्य संरक्षित स्मारक श्री कालभैरव मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी ७९ लाख २ सहस्र ६०० रुपये निधी संमत करण्यात आला आहे. तेर (जिल्हा धाराशिव) येथील तीर्थकुंडाच्या संवर्धनासाठी ५ कोटी ११ लाख ६६ सहस्र २०३ रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे.

शासन १ सहस्र ६९० शिवकालीन शस्त्रे कह्यात घेणार !


कोल्हापूर येथील शिवकालीन शस्त्रसंग्राहक स्वर्गीय गिरीश जाधव यांनी संग्रहित केलेली १ सहस्र ६९० शिवकालीन शस्त्रे राज्यशासन संपादित करणार आहे. यासाठी शासनाकडून १ कोटी ७० लाख १ सहस्र १७० रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे. सद्यःस्थितीत या शस्त्राचे दायित्व स्वर्गीय गिरीश जाधव यांचे पुत्र डॉ. कुलदीप जाधव हे पहात आहेत. यामध्ये शिवकालीन विविधांगी शस्त्रांचा समावेश आहे. पुरातत्व विभाग हा अनमोल ठेवा जतन आणि संवर्धन करणार आहे.