‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला नांद्रा, जळगाव येथील सेवाकेंद्राशी संबंधित शेती करण्याची सेवा मिळाली. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. गहू पेरण्यासाठी गुरुकृपेने नांद्रा येथील एका ‘ट्रॅक्टर’ चालकाने केवळ डिझेलचा व्यय घेऊन शेतभूमी नांगरून देणे
गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने माझ्या मनात ‘जळगाव सेवाकेंद्राच्या एकूण शेतभूमीपैकी ४ एकरमध्ये गहू पेरावा’, असा विचार आला. तो विचार मी पुढे श्री. विष्णुपंत जाधव (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) यांना बोलून दाखवला. त्यांनी त्यासाठी लगेच अनुमती दिली. २०.१२.२०२२ या दिवसापासून प्रत्यक्ष सेवेला आरंभ झाला, उदा. गहू पेरण्यासाठी भूमी नांगरून ती भुसभुशीत करणे इत्यादी. गुरुकृपेने नांद्रा येथील एका ‘ट्रॅक्टर’ चालकाने केवळ डिझेलचा व्यय घेऊन भूमी नांगरून भुसभुशीत (रोटर) करून दिली.
२. गुरुकृपेने गहू पेरण्यासाठी लागणारे बियाणे अर्पण मिळणे
जामनेर येथील सनातनचे साधक श्री. नीलेश पाटील शेतीतील जाणकार असून ते स्वतः शेती करतात. मी त्यांना भ्रमणभाष केल्यावर ते मला म्हणाले, ‘‘काका, मी माझा ‘ट्रॅक्टर’ घेऊन येतो आणि गहू पेरून देतो. आपल्याला २०० किलो बियाणे लागेल.’’ मी श्री. विष्णुपंत जाधव यांना ‘कुठले बियाणे वापरायचे ?’, ते विचारून यावल येथील श्री. खुशाल पाटील यांना संपर्क केला. त्यांचा खताच्या विक्रीचा व्यवसाय आहे. गुरुकृपेने त्यांनी आपल्या गव्हाच्या नमुन्याप्रमाणे २०० किलो गव्हाचे बियाणे अर्पण दिले.
३. श्री. नीलेश पाटील यांनी दिवसा हिंदु राष्ट्र-जागृती सभेची आणि रात्री गहू पेरण्याची सेवा केल्यामुळे गव्हाची पेरणी नियोजित वेळेत होणे
जळगाव येथे होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या सिद्धतेसाठी श्री. नीलेश पाटील आले होते. त्यामुळे आम्हाला ते गव्हाच्या पेरणीसाठी उपलब्ध झाले. ‘२२.१२.२०२२’ हा पेरणीसाठी चांगला मुहूर्त आहे’, असे राजगुरुनगर येथील सनातनच्या एका साधकाने मला कळवले. त्यानुसार त्या दिवशी आम्ही गव्हाची पेरणी करायला आरंभ केला. श्री. नीलेश पाटील यांना दिवसभर हिंदु राष्ट्र-जागृती सभेची सेवा करायला जावे लागत असे; परंतु त्यांनी दिवसा ती सेवा करून रात्रीच्या वेळी गव्हाची पेरणी केली. त्यांना पेरणीचा पुष्कळ अनुभव आहे. त्यामुळे गव्हाची पेरणी चांगली होऊन २०० किलो गहू नियोजित वेळेत पेरला गेला.
४. गुरुकृपेने गव्हाला वेळेच्या वेळी पाणी दिले जाणे आणि सेंद्रिय खत घालून जीवामृताची फवारणी केली जाणे
गव्हाला वेळेवर पाणी देणेही महत्त्वाचे होते. देवाच्या कृपेने नांद्रा येथील एका साधकाने गव्हाला पाणी देण्याची सेवा अडीच मास अखंडपणे केली. आम्ही आधीच जीवामृत सिद्ध करून ठेवले होते. गव्हाला पाणी देतांना आम्ही त्यात जीवामृत घातले. सहसाधकांनी दायित्व घेऊन गव्हाला खत (सिद्ध केलेले सेंद्रिय खत) घालून त्यावर जीवामृताची फवारणी केली. गव्हाला पाणी देणार्या साधकाला नोकरी लागल्यानंतर देवाच्या कृपेने नांद्रा येथील काही साधकांनी गव्हाला पाणी देण्याच्या सेवेसाठी साहाय्य केले. गव्हाला वेळच्या वेळी पाणी दिले गेल्यामुळे गव्हाचे पीक चांगले आले. गुरुकृपेने सर्वच कामे समयमर्यादेत केली गेली.
५. २०.३.२०२३ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी जळगाव सेवाकेंद्राच्या भूमीचे दर्शन घेतले आणि शेतातील गव्हाच्या पिकावर हात फिरवून आशीर्वाद दिला.
६. वादळी पाऊस पडण्याचे संकेत मिळाल्यावर साधकांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना केल्यावर गव्हाच्या पिकाचे वारा आणि पाऊस यांपासून रक्षण होणे
‘७ ते १४ मार्च २०२३ आणि ११ ते १६ एप्रिल २०२३ या कालावधीत वेगाने वारा वाहील आणि जोरदार पाऊस अन् गारा पडतील’, असा संकेत हवामान विभागाने दिला होता. तेव्हा सर्व साधकांनी गुरुदेव आणि सद्गुरु नंदकुमार जाधव यांना प्रार्थना केली, ‘सेवाकेंद्राच्या शेतातील गव्हाच्या प्रत्येक दाण्यातून साधकांना साधना आणि सेवा यांसाठी शक्ती मिळणार आहे. गुरुदेव, आमच्या हातात काहीच नाही. आपणच पाऊस, वारा आणि गारा या संकटांपासून शेतातील गव्हाचे रक्षण करा.’ श्री. विष्णुपंत जाधव यांनी सुचवल्यानुसार आम्ही ग्रामदेवतेचीही पूजा करून नारळ वाढवून तिला प्रार्थना केली. जळगाव येथे सर्वत्र ‘विजा चमकणे, सोसाट्याचा वारा वहाणे आणि जोराचा पाऊस पडणे’, अशी आपत्कालीन स्थिती निर्माण झाली; मात्र गुरुकृपेने दोन्ही वेळी नांद्रा गावाच्या शिवारात पाऊस अन् वारा यांची फारशी झळ पोचली नाही. त्यामुळे शेतातील गव्हाच्या पिकाचे रक्षण झाले. गव्हाचे पीक आल्यावर गहू जळगाव सेवाकेंद्रातून पुढे देवद (पनवेल) येथील आश्रमात पोचेपर्यंत पाऊस-वारा-गारा यांचा कुठलाही त्रास झाला नाही. त्यामुळे आम्हा साधकांचा गुरुदेवांप्रतीचा कृतज्ञताभाव जागृत झाला.
७. गव्हाची कापणी आणि मळणी करून गहू जळगाव सेवाकेंद्रात पाठवण्याची सेवा करतांना पुष्कळ कडक ऊन असूनही साधकांना कुठलाही त्रास न होणे
गव्हाची कापणी आणि मळणी झाल्यावर गहू पहाण्यासाठी सद्गुरु जाधवकाका शेतामध्ये आले. गव्हाच्या राशीला हात लावून ते आम्हाला म्हणाले, ‘‘गहू छान आला आहे.’’ सहसाधकांनी ‘गहू चाळून, त्याच्या गोण्या भरून गहू जळगाव सेवाकेंद्रात पाठवणे’, या सर्व सेवा कडक उन्हामध्ये केल्या. सहसाधकांनी ४ दिवस कडक उन्हामध्ये सेवा करूनही कुणालाही त्रास झाला नाही.
८. गव्हाचे पीक घेण्याची सेवा साधना म्हणून केल्याने साधकांना या सेवेतून आनंद मिळणे
आम्ही (शेतीच्या सेवेतील साधक) प्रत्येक दिवशी नित्यनेमाने देव, गुरुदेव आणि सद्गुरु जाधवकाका यांना प्रार्थना करूनच शेतीच्या सेवेला आरंभ करत होतो आणि सेवा संपल्यावर कृतज्ञता व्यक्त करत होतो. आम्ही प्रत्येक कृती श्री. विष्णुपंत जाधव यांना विचारून आणि एकत्र बसून त्यावर विचारविनिमय करून करत होतो. सांगितलेल्या सूत्रांचे आम्ही आज्ञापालन करत होतो आणि आमच्याकडून झालेल्या चुकांतून शिकून सेवा करत होतो. यांमुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचा ताण न येता या सेवेतून आनंद मिळाला.
९. शिकायला मिळालेली सूत्रे
अ. एकमेकांशी विचारविनिमय केल्यामुळे सेवेतील साधकांकडून काही सूत्रे शिकता आली.
आ. ‘सांघिक भाव असल्यावर गुरुकृपा कशी होते ?’, ते अनुभवता आणि शिकता आले.
इ. ‘उत्तरदायी साधकांचे आज्ञापालन केल्यामुळे कसा लाभ झाला ?’, तेही अनुभवता आणि शिकता आले.
ई. या सेवेत ‘आपण कुठे न्यून पडलो ? अजून चांगले कसे करू शकतो ?’, हे शिकता आले.
उ. ‘प्रत्येक सूत्र सद्गुरु जाधवकाकांना विचारून केल्यामुळे कुठेही अडचण न येता, सर्व सेवा सुरळीत आणि योग्य प्रकारे झाल्या’, असे अनुभवता आणि शिकता आले.
१०. नांद्रा येथील साधकांना सेवाकेंद्राच्या शेतभूमीविषयी आलेल्या अनुभूती
अ. नांद्रा येथील साधकांच्या मनामध्ये सेवाकेंद्राच्या शेतभूमीविषयी जवळीक निर्माण झाली आहे. साधकांना ‘शेतात गेल्यावर तिथून परत जाऊ नये, तिथेच थांबावे’, असे वाटते.
आ. साधकांना सेवाकेंद्राची शेती पाहून पुष्कळ आनंद होतो.
इ. काही साधकांना सेवाकेंद्राच्या शेतभूमीत हनुमंताचे दर्शन झाले.
‘आम्हा साधकांकडून ही सेवा करून घेऊन आम्हाला अनुभूती आणि आनंद दिला’, यासाठी आम्ही गुरुदेव आणि सद्गुरु जाधवकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– श्री. यशवंत अनंत सहस्रबुद्धे (आताची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६९ वर्षे), जळगाव सेवाकेंद्र. (१८.४.२०२३)