‘ऑनलाईन साधना सत्संगा’द्वारे गुरुकृपायोगानुसार साधना करू लागल्यावर साधिकेत झालेले सकारात्मक पालट !

सौ. मिनल पावसकर

१. गुरुकृपायोगानुसार ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना कशी करायची ?’, हे शिकल्यामुळे स्वतःमध्ये सकारात्मक पालट होणे

‘मी सनातन संस्थेच्या माध्यमातून मागील २ वर्षांपासून ऑनलाईन साधना सत्संगाला जोडले आहे. साधनेत येण्यापूर्वी मला काहीच ठाऊक नव्हते; पण मला गुरुप्राप्तीची तळमळ होती. सनातन संस्थेच्या माध्यमातून गुरुकृपायोगानुसार ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना कशी करायची ?’, याची मला माहिती मिळाली. त्यामुळे स्वतःमध्ये पुष्कळ सकारात्मक पालट झाले.

२. गुरुकृपेने सनातनचा रामनाथी (गोवा) येथील आश्रम पहाण्याची इच्छा पूर्ण होणे

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात कधी जायला मिळेल ?’, याबद्दल माझ्या मनात उत्सुकता होती. ‘माझी तेवढी योग्यता नाही’, असे वाटून मी त्याविषयी कधी विचारले नाही. आमचे मूळ गाव कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे आहे. त्यामुळे ‘सुटीत गावी गेल्यावर गोव्याला जाऊन बाहेरूनच आश्रमाचे दर्शन घेऊन येऊ’, असा विचार माझ्या मनात आला. दुसर्‍या दिवशी मी माझ्या यजमानांना (श्री. वैभव पावसकर यांना) याविषयी बोलूनही दाखवले. त्यानंतर काही वेळाने कु. क्रांती पेटकर या ताईंनी भ्रमणभाष करून मला विचारले, ‘‘तुम्ही एप्रिलमध्ये रामनाथी येथील आश्रमात जाऊ शकता का ?’’ तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. गुरुमाऊलींनी मनात आलेली इच्छा लगेच पूर्ण केली; म्हणून मला कृतज्ञता वाटली.

३. आश्रमात आल्यावर माझा दीड वर्षांचा मुलगा कु. तेजस सर्व साधकांकडे अगदी ओळख असल्याप्रमाणे जायचा. मी आणि माझे यजमान नसलो, तरी तो त्यांच्याकडे रमायचा.

गुरुकृपेनेच मला रामनाथी आश्रम पहाण्याचा अनुभव घेता आला. सर्व साधकांकडून पुष्कळ शिकता आले. त्यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मिनल वैभव पावसकर, चिंचवड, पुणे. (२६.४.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक