पुणे येथील इंद्रायणी नदीच्या जलप्रदूषणाच्या विरोधात सामाजिक संस्था आक्रमक !
आळंदी (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीतील रसायनयुक्त पाणी आणि नदीच्या काठच्या गावांतील मैलायुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता इंद्रायणीच्या नदीपात्रामध्ये सोडले जात आहे. वारकरी आणि भाविक यांच्या, तसेच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालू आहे, असा आरोप ‘मानवी हक्क संरक्षण संस्थे’ने केला आहे. इंद्रायणी जलप्रदूषणाच्या विरोधात नदीत उतरून तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मानवी हक्क संरक्षण संस्थेकडून ‘मूक आंदोलन’ करण्यात आले. इंद्रायणीच्या पाण्यामध्ये रासायनिक पाणी सोडणार्या आस्थापनांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी. नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावीत, अशा मागण्याही करण्यात आल्या. (गणेशोत्सवाच्या वेळी तथाकथित प्रदूषणाचे कारण पुढे करत गणेशभक्तांना मूर्ती विसर्जनास प्रतिबंध करणारे प्रशासन प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना का करत नाही ? – संपादक) आळंदीत माऊलींच्या समाधी दर्शनासाठी सहस्रो वारकरी येतात. इंद्रायणीच्या पात्रात स्नान करतात; मात्र नदीत पुष्कळ प्रमाणात जलप्रदूषण झाल्याचा आरोपही संस्थेने केला आहे.