विठूरायाविना कुणी नाही !

लिंबा वाघे

‘विठूरायाविना मला आहे तरी कोण… सर्वांचा धनी तोच आहे.’ धाराशिवमधील एका गावातील ८५ वर्षीय आजी लिंबा वाघे यांचे हे बोल मनाला निश्‍चितच भावतात. विटांचे साधे घर, अत्‍यावश्‍यक साहित्‍य, नेसण्‍यासाठी केवळ २ साड्या, अंगावर एकही दागिना नाही, घरात वीज नाही, न्‍हाणीघर नाही; परंतु चेहर्‍यावर मात्र पुष्‍कळ समाधान असणार्‍या या आजींच्‍या आनंदामागचे रहस्‍य काही वेगळेच आहे. नुकतीच त्‍यांनी स्‍वत:च्‍या ११ एकर भूमीपैकी ६ एकर भूमी विकून त्‍यातील पैशांतून विठूरायाला २६ तोळ्‍यांचा करदोडा आणि रखुमाईसाठी सोन्‍याचे गंठन अर्पण केले. या आजींनी याआधीही ५० लाखांहून अधिक रुपये वेगवेगळ्‍या मंदिरांमध्‍ये अर्पण केले आहेत. आजच्‍या कलियुगात अशा व्‍यक्‍ती दुर्मिळ आहेत ! याउलट पाहिले तर गळ्‍यात मोठी माळ, साखळ्‍या हातात भलीमोठी सोन्‍याची कडी, पुष्‍कळ अंगठ्या इत्‍यादी पुष्‍कळ दागिने अंगावर घालून मिरवणारे काही ‘गोल्‍डन मॅन’ बरेच ठिकाणी बघायला मिळतात. सध्‍या सर्वसामान्‍यांचे जीवन पाहिले, तर जो तो स्‍वत:साठी आणि कुटुंबासाठी पैसे कमावून स्‍वत:चे जीवन सुखमय करण्‍याचा प्रयत्न करत असतो. पुरेसे पैसे कमावले, तरी भावी आयुष्‍यासाठी अजून अजून पैैसे कमावण्‍यात आणि त्‍याची चिंता बाळगण्‍यातच आयुष्‍य निघून जाते. त्‍यामुळे दैनंदिन जीवनात ज्‍या देवाने आपल्‍याला जन्‍म आणि सर्व काही दिले आहे, त्‍या ‘देवासाठी आपण काहीतरी करायला हवे’, असा विचारच कुणाच्‍या मनात येत नाही. ‘गरज पडेल तेव्‍हा देव आठवतो’ आणि मग स्‍वत:च्‍या इच्‍छा-आकांक्षा पूर्ण करण्‍यासाठी देवाला नवस बोलणे, साकडे घालणे, देवळात जाऊन दर्शन घेणे इत्‍यादी कृती केल्‍या जातात. काही व्‍यक्‍तींकडून तर प्रसिद्धीसाठी आणि स्‍वत:चा मोठेपणा मिरवण्‍यासाठी मोठमोठ्या देणग्‍या देऊन अथवा दागिने अर्पण केले जातात. देव भावाचा भुकेला आहे. त्‍यामुळे सकाम भावनेने केलेले हे दान खरेच देवापर्यंत पोेचत असेल का आणि देवाला तरी ते आवडेल का ? या पार्श्‍वभूमीवर संपत्तीचा कुठलाही मोह न बाळगता, त्‍याविषयी कुठलीही आसक्‍ती न ठेवता विठूरायावर श्रद्धा ठेवून, त्‍याची भक्‍ती करून समर्पितभावाने अन् आनंदाने जीवन जगणार्‍या लिंबेआजी आदर्शवत्‌च होत. स्‍वत:ची संपत्ती विकून त्‍यातील पैशांतून त्‍या ऐषारामात जीवन जगू शकल्‍या असत्‍या; परंतु ‘जे काही आहे, ते विठूरायाचेच’, असा दृढ भाव असणार्‍या लिंबेआजी असमाधानी नि भक्‍तीहीन मानवसमूहासाठी दिशादर्शक आहेत, हेच खरे !

– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.