दापोली तालुक्याला ११० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट !
दापोली – दापोली तालुक्याला ११० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती पंचायत समिती कृषी विभाग दापोली यांच्याकडून देण्यात आली आहे. यानुसार तालुक्यातील पर्हे आणि नद्या यांवर बंधारे बांधून पाणी अडवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. याकरता विद्यार्थी, स्वयंसेवक नागरिक यांची श्रमशक्ती वापरली जाणार आहे. या अनुषंगाने जलसंपदा विभाग आणि यशदा यांच्या माध्यमातून जलप्रेमी या नात्याने काम करणारे प्रशांत परांजपे यांनी आवाहन केले आहे की, प्रत्येक नदीमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे बंधारे बांधण्याचे ऐवजी पक्क्या स्वरूपाचे टप्प्याचे बंधारे बांधण्यात यावेत.
यामुळे प्रतिवर्षी वाया जाणारी श्रमशक्ती वाचेल. त्याचप्रमाणे सिमेंटच्या गोणीत वाळू भरून बंधारे बांधले जात असतात. मार्चमध्ये प्रखर उन्हामुळे या सिमेंटच्या गोणी तुटतात आणि त्याचे दोरे आणि कापडाचे तुकडे हे नदीत इतस्तत: पसरतात. मोठ्या पावसामध्ये हा संपूर्ण प्लास्टिकचा कचरा नदीच्या अन्य भागात आणि समुद्रात पसरतो. यामुळे पक्षी आणि जलचर यांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.
शिवाय हे बंधारे भूमीच्या वर बांधल्याने त्याचा उपयोग हा फार काळ टिकून रहात नाही. कोकणातील मृदा सच्छिद्र प्रकारातील आहे. त्यामुळे या बंधार्याखालून पाणी निघून जाते. कालांतराने बंधारा परिसरात नदी कोरडी पडते. नदी शास्त्रानुसार नदी कायम प्रवाही कशी राहील ? याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
जलप्रदूषण टाळण्यासाठी सिमेंटच्या गोणी वापरणे, हे टाळणे अत्यावश्यक आहे. आपणच आपल्या हाताने बंधारा बांधताना कचरा करतो आणि नदी स्वच्छतेसाठी लाखो रुपयांचा खर्चही करतो, हे दुष्टचक्र थांबवण्याकरता आणि कायमस्वरूपी आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याकरता सिमेंटचे पक्के बंधारे बांधणे अत्यावश्यक असल्याचे मत जलप्रेमी प्रशांत परांजपे यांनी व्यक्त केले