मांस विक्रेत्यांना सरकार देणार हानीभरपाई !
सेऊल (दक्षिण कोरिया) – दक्षिण कोरियामध्ये लवकरच कुत्र्याचे मांस खाण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. सत्ताधारी पक्षाकडून ही घोषणा करण्यात आली आहे. यासाठी संसदेत याचवर्षी विधेयक सादर केले जाणार आहे. दक्षिण कोरियात कुत्र्याचे मांस खाण्यावरून जगभरातून टीका होत आहे. प्राणीमित्र संघटनाही याला विरोध करत आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण कोरियात प्रतिवर्षी २० लाख कुत्र्यांना ठार केले जाते, तर कुत्र्याचे १ लाख टन मांस खाल्ले जाते.
१. कुत्र्यांच्या मांसावर बंदी घातल्यामुळे ज्या कसायांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे, त्यांना सरकार हानीभरपाई देणार आहे. यापूर्वी कुत्र्याच्या मासांवर बंदी घालण्यासाठी संसदेत अनेकदा विधेयक आणण्यात आले होते; मात्र संबंधित व्यावसायिकांनी विरोध केल्याने ते संमत होऊ शकले नव्हते.
२. दक्षिण कोरियाचे सध्याचे राष्ट्रपती यून सुक यिओल यांची पत्नी किम किओन याही अनेक वर्षांपासून कुत्र्याचे मांस खाण्याचा विरोध करत आल्या आहेत. त्यांनी अनेक भटक्या कुत्र्यांना दत्तकही घेतले आहे.