कोल्हापूर – शाहूपुरी येथील ५ वी गल्ली येथील श्री बालमुकुंद बालावधूत दत्तमहाराज यांच्या मठीचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. याचा वास्तूशांती पूजन आणि गृहप्रवेश सोहळा १८ नोव्हेंबरला भक्तांच्या उपस्थितीत अत्यंत भावमय वातावरणात पार पडला. याचे पौरोहित्य बालमुकुंद रुद्र अभिषेक सेवा केलेले आणि वालावकर ट्रस्ट रुग्णालयातील प्राणप्रतिष्ठा केलेले श्री. बाळकृष्ण हरि थिटेगुरुजी यांनी केले. या मंगलप्रंसगी श्री. आणि सौ. थिटे दांपत्याचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी १७ नोव्हेंबरला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि मराठी भाषामंत्री श्री. दीपक केसरकर यांनी मठीचे दर्शन घेतले. या प्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री. अमित कामत यांनी त्यांचे स्वागत केले.
या भावसोहळ्यासाठी महाराजांचे भक्त डॉ. मुकुंद दुसाणे, सर्वश्री बाजीराव रावळ, विनायक गुरव, दिगंबर गुरव, अभय हळवे, बाळासाहेब सोनार यांसह अन्य भाविक, भक्त उपस्थित होते. दुपारी आणि सायंकाळी श्री. अमोल बुचडे संचलित श्री कलानगरी भजनी मंडळ अन् संगीता राणे संचलित मंगेशलक्ष्मी महिला भजन यांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. या मठीचे विशेष म्हणजे श्री बालमुकुंद बालावधूत दत्तमहाराज यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष वास्तव्य केले असून येथे त्यांची समाधी आहे.