उद्या, कार्तिक शुक्ल षष्ठी (१९ नोव्हेंबर २०२३) या दिवशी पू. पद्माकर होनप यांची प्रथम पुण्यतिथी आहे. या निमित्ताने…
१. अग्नीसंस्कार विधी
३१.१०.२०२२ या दिवशी (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या पार्थिवावर अग्नीसंस्कार करण्यात आला. त्या वेळी आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१ अ. अग्नी दिल्यानंतर आलेल्या अनुभूती
१. ‘स्मशानभूमीत गेल्यावर आरंभी दाब जाणवत होता; पण बाबांच्या दहनविधीला आरंभ झाल्यावर वातावरणात पालट जाणवला. वातावरण हलके आणि आनंदी वाटू लागले.
२. अग्नीच्या ज्वाळा केशरी रंगाच्या होत्या. त्या उंच उंच जात होत्या. त्या ज्वाळांच्या टोकांमध्ये कमळाचा आकार दिसत होता. त्या ज्वाळा वर वर जाऊन नाहीशा होत होत्या. ते पाहून ‘बाबांनी त्यांच्या ज्वाळांतून देवाला कमळे अर्पण केली’, असे जाणवून माझी भावजागृती झाली.
३. अग्नीच्या ज्वाळांमध्ये नागाकृती, तसेच त्रिशूळ आणि ‘ॐ’ ही शुभचिन्हेही दिसत होती.
४. चिता धगधगत असूनही तिच्याकडे पाहून मनाला शांत वाटत होते.
५. चिता धगधगून पेटली होती; पण त्या वेळी जराही उष्णता जाणवत नव्हती. वातावरणात एक आल्हाददायक गारवा जाणवत होता.
६. ‘अग्निदेवतेने बाबांना तिच्या कुशीत घेतले आहे आणि तिला आनंद झाला आहे’, असे मला जाणवत होते.
७. बाबांना अग्नी दिल्यावर त्यातून यज्ञातून गंध यावा, त्याप्रमाणे गंध येत होता.’
१ आ. क्षमायाचना केल्यानंतर पू. होनपकाका आशीर्वाद देत असल्याचे दिसणे
१. ‘अग्नीसंस्कार झाल्यावर स्मशानातून निघण्यापूर्वी मी बाबांकडे स्वतःकडून कळत आणि नकळतपणे घडलेल्या चुकांविषयी क्षमायाचना केली. त्या वेळी मला अग्नीमध्ये सूक्ष्मातून बाबांचा आशीर्वादाचा हात आणि त्यांचा तोंडवळा स्पष्टपणे दिसला. तेव्हा कृतज्ञता व्यक्त केली.’
१ इ. पू. होनपकाका यांच्या देहाचे ज्वलन सहजतेने आणि लवकर होणे
१. ‘एरव्ही मृतदेहाचे ज्वलन होण्यासाठी ४ – ५ किलो तूप लागते. बाबांच्या देहाचे ज्वलन होण्यासाठी केवळ पाव किलो तूप लागले. चितेवर रचलेली मोठी लाकडे ओलसर होती, तरीही चिता अल्प वेळात धगधगून पेटली आणि देहाचे ज्वलन सहजतेने अन् लवकर झाले. याविषयी पुरोहित पाठशाळेतील साधक श्री. सिद्धेश करंदीकर म्हणाले, ‘‘असे आम्ही प्रथमच अनुभवत आहोत.’’
त्या वेळी मनात विचार आला, ‘बाबांचा देह साधनेमुळे चैतन्यमय झाला होता. त्यांच्या मनात कुठलीही इच्छा राहिली नव्हती आणि रज-तमाचे जडत्व नव्हते. असा पवित्र देह अग्निदेवता आनंदाने स्वीकारते.’
२. वरील प्रसंगाविषयी माझ्या (सुश्री (कु.) दीपाली यांच्या) मनात विचार आला, ‘बाबा सतत इतरांचा विचार करत असत. त्यामुळे या ठिकाणीही त्यांच्या देहाचे लवकर दहन झाले आणि तेथील साधक अन् नातेवाईक यांना अधिक वेळ थांबावे लागले नाही. स्वतःच्या दहनाच्या वेळीही त्यांनी इतरांचा विचार केला.’
३. चितेच्या अग्नीकडे पाहून आमचे मन निर्विचार झाले आणि आमच्या मनाला आनंद जाणवत होता.’
२. अस्थिसंचयन विधी
२.११.२०२२ या दिवशी अस्थिसंचयन (अस्थी गोळा करण्याचा) विधी झाला. त्या वेळी आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. ‘अस्थिसंचयन विधीसाठी स्मशानभूमीत गेल्यावर मी बाबांच्या रक्षेकडे पाहिले. तेव्हा मला शांत वाटले.
२. बाबांची रक्षा डब्यांमध्ये गोळा केली आणि ते डबे गाडीत ठेवले. विधी झाल्यावर गाडीत बसून आश्रमात जायला निघाल्यावर रक्षा असलेल्या डब्यांतून दैवी सुगंध येत होता.
३. बाबांची अस्थीतून ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा जप ऐकू आला. संत चोखा मेळा यांच्या अस्थींतून ‘विठ्ठल, विठ्ठल’, असा नामजप ऐकू आलेला. बाबांच्या अस्थीतून नामजप ऐकू आल्यावर मला संत चोखा मेळा यांची आठवण झाली. त्या वेळी ‘तुमच्याप्रमाणे शेवटच्या क्षणापर्यंत मलाही सतत देवाच्या अनुसंधानात रहाता येऊ दे’, अशी बाबांच्या चरणी प्रार्थना झाली.
४. त्या वेळी माझा (श्री. राम होनप यांचा) ‘निर्विचार’ हा नामजप आपोआप चालू झाला. शेवटच्या क्षणापर्यंत बाबांचा ‘निर्विचार’ हा जप चालू होता.
५. ‘बाबांची रक्षा गोळा करतांना मनाला आनंद जाणवत होता.’
– श्री. राम होनप ((कै.) पू. पद्माकर होनप यांचा धाकटा मुलगा) आणि सुश्री (कु.) दीपाली होनप ((कै.) पू. पद्माकर होनप यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३. अस्थीविसर्जन विधी
३ अ. श्री. राम होनप
३ अ १. बाबांच्या कृपेमुळे अस्थीविसर्जन विधीतील चूक टळणे : ‘२.११.२०२२ या दिवशी बाबांच्या अस्थींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यात आले. माझा भाऊ अस्थीविसर्जन करण्यासाठी वहात्या पाण्यात मध्यभागी उभा होता. अस्थी असलेल्या कलशाला वरून वस्त्राने बांधले होते. भावाने कलश पाण्यात विसर्जित केला. कलश पाण्यात वहात पुढे गेला. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘धर्मशास्त्रानुसार कलशातील अस्थी पाण्यात विसर्जित करून त्यानंतर कलश पाण्यात सोडायचा असतो. आपल्याकडून काहीतरी चूक तर झाली नाही ना ?’ त्यानंतर मी सनातनच्या पुरोहित-साधकास भ्रमणभाषवर वरील प्रश्न विचारला. त्या वेळी पुरोहित-साधकाने ‘पाण्यात अस्थी विसर्जन करून त्यानंतर कलश पाण्यात सोडणे योग्य आहे’, असे मला सांगितले.
मी वरील माहिती मिळवत असतांना माझ्यापासून काही अंतरावर पाण्यात असलेल्या भावाला याविषयी काही ठाऊक नव्हते. या कालावधीत भावाला तो कलश काही अंतरावर एका वेलीमध्ये अडकलेला दिसला. हे पाहून भाऊ तो कलश परत मिळवण्यासाठी पाण्यातून चालून त्या ठिकाणी पोचला आणि त्याला कलश मिळाला. तेव्हा मी भावाला कलशातील अस्थी पाण्यात विसर्जित करण्यास सांगितले आणि त्याने त्याप्रमाणे कृती केली.
‘वहात्या पाण्यात कलश ३ – ४ मिनिटे अडकून रहाणे’, ही आमच्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती. त्यानंतर ‘आमच्याकडून चूक होऊ नये’, यासाठी बाबांनीच सूक्ष्मातून तो कलश पाण्यात थांबवून ठेवला आहे’, असे मला जाणवले.’
लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ५.११.२०२२
‘पू. पद्माकर होनप यांनी स्वतःचे ‘पद्माकर’ हे नाव सार्थक केले’, असे जाणवणे‘बाबांचे नाव ‘पद्माकर’ होते. त्यांना कोणत्याही गोष्टीची आसक्ती नव्हती. त्यांनी सर्वांवर भरभरून प्रेम केले; पण ते कुणात अडकले नाहीत. त्यांचे जीवन कमळाप्रमाणे अनासक्त होते. त्यांच्या चितेच्या ज्वाळांच्या टोकांमध्येही कमळाचा आकार दिसला. यावरून ‘त्यांनी त्यांचे ‘पद्माकर’ हे नाव सार्थक केले’, असे मला जाणवले.’ – सुश्री (कु.) दीपाली होनप |
भक्तवत्सल परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रीती !
‘बाबांच्या अंत्यविधीनंतर आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी मी त्यांना वरील प्रसंग सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘साधकांप्रमाणे मीही सर्व केले बरं का !’’ त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टररूपी भक्तवत्सल भगवंताची प्रीती पाहून माझी भावजागृती झाली.’
– सुश्री (कु.) दीपाली होनप ((कै.) पू. पद्माकर होनप यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.३.२०२३)
वडिलांच्या (पू. (कै.) पद्माकर होनप) यांच्या देहत्यागाच्या वेळी ‘सनातन हे एक कुटुंब आहे’, याची साधिकेला आलेली प्रचीती !
१. ‘३०.१०.२०२२ या दिवशी दुपारी ४.२७ वाजता माझे वडील पद्माकर होनप (सनातनचे ७ वे संत, वय ७४ वर्षे) यांनी देहत्याग केला. तेव्हा मला एका साधिकेकडून समजले, ‘त्या दिवशी स्वयंपाकघरात मसाला बनवून आमटी करणार होते; पण पू. रेखाताई (सनातनच्या ६० व्या संत पू. रेखा काणकोणकर (वय ४५ वर्षे)) स्वयंपाकघरातील साधिकांना म्हणाल्या, ‘‘आज पू. होनपकाकांनी देहत्याग केला आहे. त्यामुळे मसाला बनवून आमटी करू नका. दुपारची आमटीच गरम करून रात्रीच्या जेवणात ठेवूया.’’ त्या वेळी एका संतांचा दुसर्या संतांप्रतीचा भाव पाहून मला भरून आले.
२. ३१.१०.२०२२ या दिवशी सकाळी बाबांचा अंत्यविधी करण्यात येणार होता. त्या दिवशी स्वयंपाकघरातील साधिकांनी पहाटे ५ वाजता स्वयंपाकाला आरंभ केला. सकाळी ९ वाजेपर्यंत त्यांचा स्वयंपाक सिद्ध होता. अंत्यदर्शन भोजनकक्षाच्या परिसरात होणार असल्याने आणि साधक अंत्यदर्शनासाठी येणार असल्याने साधकांनी सकाळी ९ वाजण्यापूर्वीच अल्पाहार केला होता. त्यानंतर भोजनकक्षात शांतता होती.
त्या दिवशी दुपारी २.३० वाजता बाबांना अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेण्यात आले. तोपर्यंत आश्रमातील साधकांनी दुपारचा महाप्रसाद ग्रहण केला नव्हता. बाबांना स्मशानभूमीत नेल्यानंतरच सर्वांनी महाप्रसाद ग्रहण केला.
यातून सर्व साधकांचा कुटुंबभाव माझ्या लक्षात आला आणि ‘सनातन हे एक मोठे कुटुंब आहे’, याची पुन्हा एकदा जाणीव झाली. त्या वेळी साधकांमध्ये कुटुंबभावना निर्माण करणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.
वरील दोन्ही प्रसंग ऐकल्यावर अंत्यविधीसाठी आलेले आमचे नातेवाईक आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, ‘‘असे कुठेच पहायला मिळत नाही. हे सर्व अद़्भुत आहे.’’
– सुश्री (कु.) दीपाली होनप ((कै.) पू. पद्माकर होनप यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.३.२०२३)
कै. (पू.) होनपकाकांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी जाणवलेली सूत्रेअ. ‘पू. होनपकाकांकडे पहातांना माझे मन निर्विचार झाले. आ. मला सगळीकडे सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे जाणवत होते. इ. ‘पू. काकांच्या शरिरातून पांढरा प्रकाश येत असून ते श्वास घेत आहेत’, असे मला जाणवले. – कु. जिगिषा दर्शन म्हापसेकर (वय १८ वर्षे), कणकवली, सिंधुदुर्ग. (२८.१०.२०२२) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |