कोल्हापूर – ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, जिल्ह्यातील साखर कारखानदार अन् कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे १६ नोव्हेंबरला झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. यामुळे यापुढील काळात जिल्ह्यातील ऊसतोड बंद रहाणार असून १९ नोव्हेंबरला ‘चक्काजाम’ (वाहतूक बंद) आंदोलन होणारच आहे, असे संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी घोषित केले. काही कारखानदार उसाला पहिली उचल ३ सहस्र १०० रुपये देण्यास सिद्ध झाले होते; मात्र हे संघटनेने मान्य केले नाही.
या संदर्भात राजू शेट्टी म्हणाले, ‘‘कानपूर शुगर टेक्नॉलॉजी’ यांचेे उत्पादन शुल्काच्या व्ययाच्या निकषाप्रमाणे उत्पादन व्यय करावा. काही कारखाने किमान मूल्यभूत किमतीपेक्षा ५६२ रुपये अधिक देत आहेत, तर काही जण तो देण्यास सिद्ध नाहीत. या संदर्भात नेमलेली समिती आम्हाला मान्य नाही. आमच्या आंदोलनात पोलिसांनी येऊ नये, अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे.’’ बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देतांना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘‘दरासाठी कारखानानिहाय आम्ही समित्या नेमल्या आहेत, त्या लवकरच निर्णय घोषित करतील.’’