ऑस्‍टीन (अमेरिका) येथील चि. मानवी प्रशांत कागवाड (वय १ वर्ष ७ मास) हिची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के असल्‍याचे घोषित !

‘सनातनमध्‍ये आलेल्‍या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्‍यात निर्माण झाला नाही.’ – (परात्‍पर गुरु) डॉ. आठवले 

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! चि. मानवी प्रशांत कागवाड ही या पिढीतील एक आहे !

चि. मानवी कागवाड

बेळगाव – लक्ष्मीपूजनाच्‍या दिवशी सनातनच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे चि. मानवी प्रशांत कागवाड (वय १ वर्ष ७ मास) ही महर्लोकातून जन्‍माला आलेली असून तिची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के असल्‍याचे घोषित केले. चि. मानवी ही ऑस्‍टीन, अमेरिका येथे असणारे श्री. प्रशांत कागवाड आणि सौ. सहाना कागवाड यांची मुलगी आहे. दोघांनाही ही आनंदवार्ता ऐकून आनंद झाला. बेळगाव येथे रहाणारे सनातनचे साधक श्री. दिलीप कागवाड (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ६५ वर्षे) आणि सौ. आशा कागवाड यांची ती नात आहे. त्‍यांनाही ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे जोडलेले होते.

श्री. प्रशांत कागवाड आणि सौ. सहाना कागवाड

ही आनंदवार्ता ऐकून खरी दिवाळी साजरी झाली ! – प्रशांत कागवाड (चि. मानवीचे वडील)

श्री. प्रशांत कागवाड यांना दीपावलीच्‍या दिवशी मिळालेली आनंदवार्ता ऐकून सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याविषयी कृतज्ञता वाटली. ‘ही आनंदवार्ता ऐकल्‍यानंतर खरी दिवाळी साजरी झाली’, असे ते म्‍हणाले.

लक्ष्मीपूजनाच्‍या दिवशी लक्ष्मीची (चि. मानवीची) पातळी घोषित झाल्‍याविषयी कृतज्ञता ! – दिलीप कागवाड (चि. मानवीचे आजोबा (वडिलांचे वडील)

‘लक्ष्मीपूजनाच्‍या दिवशी लक्ष्मीची (चि. मानवीची) पातळी घोषित करून गुरुदेव सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी तिला मोक्षाला पाठवले आहे. चि. मानवीच्‍या आध्‍यात्मिक प्रगतीची वार्ता लक्ष्मीपूजनाच्‍या दिवशी समजल्‍यामुळे पुष्‍कळ आनंद झाला आणि गुरुदेवांविषयी कृतज्ञता वाटली.

(श्री. कागवाड चि. मानवीला ती जन्‍मल्‍यापासून लक्ष्मीच म्‍हणतात. ‘चि. मानवीच्‍या रूपात घरी लक्ष्मी आलेली आहे’, असा त्‍यांचा भाव आहे.)

वार्ता ऐकून पुष्‍कळ आनंद होऊन सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याविषयी कृतज्ञता वाटणे ! – सौ. आशा कागवाड (चि. मानवीची आजी (वडिलांची आई))

माझी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी झाली असती, तरी मला एवढा आनंद झाला नसता तेवढा आनंद मला चि. मानवीची आध्‍यात्मिक पातळी घोषित झाल्‍यानंतर झाला.  दोन नातवंडे (कु. मायरा प्रशांत कागवाड आणि चि. अवीर प्रतीक कागवाड) ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असणारे आहेत; परंतु चि. मानवीच्‍या पहिल्‍या वाढदिवसाला तिची आध्‍यात्मिक पातळी समजली नव्‍हती, त्‍यामुळे ‘कदाचित् तिची पातळी ६१ टक्‍के नसेल’, असा मनात विचार होता; परंतु अचानक ही वार्ता समजल्‍यामुळे जीवनाचे सार्थक झाले, असे मला वाटले. गुरुमाऊली संपूर्ण कुटुंबाची किती काळजी घेतात, त्‍यांनी आध्‍यात्मिकदृष्‍टया उन्‍नती असणारे कुटुंब दिले आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍याप्रति कृतज्ञता व्‍यक्‍त करते.

चि. मानवी प्रशांत कागवाड हिची नातेवाइकांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये !

१. ‘चि. मानवी पुष्‍कळ समंजस आहे. तिच्‍या समवेत कुणी नसले, तरी ती एकटी व्‍यवस्‍थित खेळते.

२.कुठलीही वस्‍तू घेण्‍यापूर्वी ती आमच्‍याकडे पहाते, म्‍हणजे ‘ही वस्‍तू घेऊ का ?’, असे ती जणू विचारत आहे’, असे आम्‍हाला जाणवते.’

– सौ. सुहाना प्रशांत कागवाड आणि श्री. प्रशांत कागवाड (चि. मानवीचे आई-वडील), ऑस्‍टीन, अमेरिका

३. ‘तिचे खाण्‍याविषयी काहीच गार्‍हाणे नसते.

४. मानवी घरी असतांना हृदयविकाराचा त्रास असलेल्‍या तिच्‍या आजोबांना कोणताही शारीरिक त्रास न होणे

चि. मानवीच्‍या आजोबांना (श्री. दिलीप कागवाड यांना) सौम्‍य स्‍वरूपाचे हृदयविकाराचे झटके येऊन गेले आहेत. त्‍यामुळे आम्‍हाला त्‍यांच्‍या प्रकृतीची काळजी वाटत होती. मानवी १ मास आमच्‍या घरी असतांना तिच्‍या आजोबांना कुठलाच शारीरिक त्रास झाला नाही. तिच्‍या आजोबांची शारीरिक प्रकृती अतिशय चांगली राहिली. त्‍यामुळे तिच्‍या आजोबांना परात्‍पर गुरुदेवांविषयी (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याविषयी) पुष्‍कळ कृतज्ञता वाटून त्‍यांच्‍या डोळ्‍यांतून भावाश्रू यायचे.

५. आजोबांनी मानवीला कडेवर घेतल्‍यावर ‘साक्षात् पद्मावतीदेवीच आली आहे’, असे त्‍यांना जाणवणे

मानवी तिच्‍या आजोबांच्‍या कडेवर असतांना त्‍यांना स्‍वतःला आध्‍यात्मिक स्‍तरावर लाभ झाल्‍यासारखे वाटतात. ती इतरांकडे असतांना हालचाल करून उसळी मारायची; पण आजोबांकडे आल्‍यावर शांत बसायची. त्‍या वेळी ‘साक्षात् पद्मावतीदेवीच त्‍यांच्‍याकडे आली आहे’, असे त्‍यांना जाणवायचे.

६. चि. मानवीमधील स्‍वभावदोष

रागीटपणा

‘गुरुदेवांनी आम्‍हाला गुणी नात दिली आणि तिच्‍याविषयी लिखाण करून घेतले’, त्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. आशा दिलीप कागवाड (चि. मानवीची आजी (वडिलांची आई), वय ५९ वर्षे), बेळगाव