बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्‍या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथील शास्‍त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

प.पू. कलावतीआई

१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन

‘नागसापाला मांडीवर बसवून घेणे, वाघाच्‍या गुहेत वस्‍ती करणे किंवा काचेचा रस पिणे’, यांकडे जसे मन जात नाही, त्‍याप्रमाणे साधकाचे मन विषयांकडे वळता कामा नये.’ – प.पू. कलावतीआई, बेळगाव (साभार : ‘बोधामृत’, प्रकरण : ‘साधकांस सूचना’, सुवचन क्र. ३)

२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन

पू. किरण फाटक

२ अ. विकारांचा अतिरेक झाल्‍यावर माणूस लयाला जातो ! : ‘आपल्‍याला बर्‍याच गोष्‍टींची नैसर्गिकरित्‍या भीती वाटत असते आणि ही भीतीच आपले एक प्रकारे रक्षणही करत असते. भिण्‍यामुळे आपला अनेक संकटांपासून बचाव होतो; म्‍हणून ‘सापाला मांडीवर बसवून घेणे, काचेचा रस पिणे किंवा वाघाच्‍या गुहेत वास्‍तव्‍य करणे’ इत्‍यादी माणसाला जमत नाही; कारण त्‍याला या सगळ्‍यांची भीती वाटत असते.

विषयांच्‍या संदर्भात मात्र उलटे होत असते. विषय जरी आपला नाश करण्‍यास आतुर असतात, तरीसुद्धा आपल्‍याला त्‍या विषयांमध्‍ये अत्‍यंत गोडी वाटत असते. ‘असे का बरे होते ? आपल्‍याला या विषयांची भीती का वाटत नाही ?’, याचा जर आपण विचार केला, तर आपल्‍या लक्षात येईल की, आपण आपल्‍या देहाला नको तितके महत्त्व देऊन लाडावून ठेवलेले असते. वेगवेगळ्‍या इंद्रियांकडून विषयांचे ज्ञान होत असते. ते आपले शरीर आणि मन यांना आनंद देत असते; परंतु संस्‍कृतमध्‍ये ‘अतिपरिचयात् अवज्ञा ।’ किंवा मराठीत ‘अति तेथे माती’, अशा म्‍हणी आहेत. त्‍यांचा अर्थ असा आहे की, कुठल्‍याही विषयाचा अतिरेक झाला की, माणूस लयाला जातो.

२ आ. षड्‍रिपू माणसाला गिळंकृत करत असतात ! : ‘काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्‍सर’, हे विषय माणसाला पूर्णपणे गिळंकृत करत असतात. कामाचा, म्‍हणजेच कामवासनेचा अतिरेक झाला की, त्‍यातून क्रोध निर्माण होतो. क्रोध निर्माण झाला की, त्‍यातून लोभ आणि मोह निर्माण होतो. हे सगळे अहंकारामुळे होत असते. अहंकार माणसाला सर्पासारखा दंश करतो. ‘माझे, माझे’, असे म्‍हणत माणूस अनेकांना दुखावत जातो. त्‍याचा राग जर त्‍याच्‍या नियंत्रणात राहिला नाही, तर तो आपल्‍या बोलण्‍याने आणि देहबोलीने अनेकांना दुखावतो, तर काही वेळा काही जणांना शारीरिक इजासुद्धा पोचवतो; म्‍हणून समर्थ रामदासस्‍वामी म्‍हणतात.

नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ॥

नको रे मना सर्वदा अंगिकारू ।
नको रे मना मत्‍सरु दंभ भारू ॥ – मनाचे श्‍लोक, श्‍लोक ६

अर्थ : अरे मना, क्रोध, जो खेदकारक असतो आणि वासना ही नाना प्रकारे चंचलता वाढवणारी असते. त्‍यामुळे त्‍यांचा अंगीकार करू नकोस अन् मत्‍सर, भोंदूगिरी यांनाही जवळ करू नकोस.

मराठीत एक म्‍हण आहे, ‘रागा रागा देश त्‍यागा, त्‍याहून रागा भीक मागा ।

स्‍पर्श, गंध (स्‍वाद) (टीप) आणि चव यांमुळे माणूस मोहात पडतो. त्‍याच्‍या आवडीचे पदार्थ समोर आले की, तो खात जातो आणि हळूहळू खाण्‍यावर त्‍याचे नियंत्रण रहात नाही. त्‍यामुळे त्‍याची प्रकृती बिघडू शकते.

टीप – गंध म्‍हणजे स्‍वाद. हा २ प्रकारचा असतो – कोणत्‍याही पदार्थाची चव घेण्‍यापूर्वीचा आणि चव घेतल्‍यानंतरचा स्‍वाद.

विषयांमुळे माणसाचे मन बहिर्मुख होते. त्‍याचे लक्ष सारखे आकर्षित करणार्‍या बाह्य गोष्‍टींकडे जात रहाते. ‘मला हे हवे, ते मला हवे, हे माझ्‍याकडे अल्‍प आहे’, अशा विचारांनी त्‍याचे मन भरून जाते आणि मग मन सुखोपभोगांच्‍या माध्‍यमांकडे आकर्षित होते. सुखोपभोगाची उपकरणे घेण्‍यासाठी लागणारा पैसा त्‍याला अल्‍प वाटू लागतो आणि मग तो पैसे कमावण्‍याच्‍या मागे धावू लागतो अन् हळूहळू त्‍याचे आयुष्‍य मध्‍यावर येते. तेव्‍हा त्‍याला समजते की, मी आयुष्‍यात काहीच कमावले नाही. या सर्व प्रकारांमध्‍ये तो आपली मानसिक शांती गमावून बसतो; कारण त्‍याच्‍या मनाविरुद्ध बर्‍याच गोष्‍टी होत जातात. त्‍याचप्रमाणे अनेक मादक पेये आणि गुटखा, ड्रग्‍स इत्‍यादींच्‍या व्‍यसनांमुळे माणूस शेवटी अंत पावतो.

२ इ. विषयांचे सुख तात्‍पुरते असल्‍याने माणसाला त्‍यातून आनंद मिळत नाही आणि खरा आनंद मिळण्‍यासाठी मनाशी संवाद साधणे आवश्‍यक आहे ! : विषयांचे सुख हे तात्‍पुरते असते. त्‍याने माणसाला कायमचा मानसिक आनंद मिळत नाही. जोपर्यंत मनाला सुख आणि दुःख यांची जाणीव होत असते, तोपर्यंत माणसाचे मन अस्‍थिर असते. ‘आनंद होणे’, हासुद्धा मनाच्‍या अस्‍थिरतेचा एक प्रकार आहे; परंतु ‘मन नितळ पाण्‍याप्रमाणे निर्मळ होणे’, यातच माणसाचे खरे सुख आहे. मन शांत होण्‍यासाठी माणूस अनेक उपाय करत असतो. तो अनेक तीर्थयात्रा करतो, अनेक देवतांचे पूजन करतो, अनेक साधू-संतांना भेटतो; परंतु यांतून त्‍याला फारसे काही गवसत नाही; कारण हे सर्व बाह्य उपचार आहेत. माणसाने स्‍वतःशी स्‍वतःच संवाद साधला पाहिजे. त्‍याने मनाच्‍या खोल डोहात डोकावून पाहिले पाहिजे.

स्‍व. सुधीर फडके यांच्‍या एका गाण्‍यात ते सांगतात,

कुठे शोधिसी रामेश्‍वर अन कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी ॥ धृ.॥

झाड फुलांनी आले बहरून,
तू न पाहिले डोळे उघडून,

वर्षाकाळी पाऊसधारा,
तुला न दिसला त्‍यात इशारा,
काय तुला उपयोग आंधळ्‍या दीप असून उशाशी ॥

देव बोलतो बाळमुखातून
देव डोलतो उंच पिकांतून
कधी होऊनी देव भिकारी
अन्‍नासाठी आर्त पुकारी
अवतीभवती असून दिसेना, शोधितोस आकाशी ॥

मनुष्‍याने स्‍वतःला विचारले पाहिजे, ‘मी हे सर्व जे करत आहे, त्‍यातून खरेच मला शांती मिळणार आहे का ? मी इतका पैसा कमावतो, त्‍याची खरेच मला आवश्‍यकता आहे का ? ‘मी अनेक प्रलोभनांना शरण जातो’, हे योग्‍य आहे का ?’

२ ई. आत्‍मनिवेदन भक्‍ती : ‘नवविधा भक्‍ती’मध्‍ये ‘आत्‍मनिवेदन भक्‍ती’ ही सगळ्‍यांत उच्‍च भक्‍ती मानली जाते. यात भक्‍त देवाशी बोलतो. तो देवाला आपली दुःखे सांगतो, तसेच ‘आपला आनंद कशात आहे ?’, हे सांगतो. तो देवाला विनवणी करतो, ‘हे देवा, मला सुखात ठेव. माझे शरीर निरोगी ठेव. तू दिलेले कार्य मी निर्मळ मनाने आणि निरोगी शरिराने शेवटपर्यंत तुला साक्षी ठेवून करत राहीन.’ त्‍या देवाला साक्षी ठेवून तो आपापली कर्मे करत रहातो.

मनुष्‍याने गुरूंचा उपदेश प्रत्‍यक्ष अथवा वेगवेगळ्‍या ग्रंथांतून घेतला पाहिजे. त्‍याप्रमाणे वर्तन करण्‍याचा प्रयत्न केला पाहिजे.

गुरुविण कोण दाखवील वाट,
आयुष्‍याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट ॥ ध्रु.॥

दिशा न कळतिया अंधारी ।
नसे आसरा नसे शिदोरी ।
कंठ दाटला आले भरूनी लोचन काठोकाठ ॥ १ ॥

२ उ. साधना केल्‍याने मन विषयांकडून शांतीकडे प्रवास करू लागते आणि मनुष्‍य मोक्षाच्‍या मार्गावर वाटचाल करू लागतो ! : आरंभी हे सर्व कठीण जाते; परंतु जसजशी सवय होते, तसतसे मन विषयांकडून शांतीकडे प्रवास करू लागते. आपण जर सतत देवाचे नामस्‍मरण करत राहिलो, तर आपल्‍या मनात त्‍या नामाचा एक अमृत कलश तयार होतो. त्‍यातील अमृत हळूहळू आपले मन आतल्‍या आत पिऊ लागते. या अमृताने अवघा देह शुचिर्भूत होतो आणि मोक्षाच्‍या मार्गावर वाटचाल करू लागतो; परंतु यासाठी साधना, उपासना आणि शेवटी तपश्‍चर्या उपयोगी पडते.’

– पू. किरण फाटक, डोंबिवली, जिल्‍हा ठाणे. (२२.८.२०२३)