सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून ‘रात्र स्‍वच्‍छता मोहिमे’त २८१ टन कचरा संकलित !

मिरज, १४ नोव्‍हेंबर (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून दिवाळी उत्‍सवामध्‍ये ‘रात्र स्‍वच्‍छता मोहीम’ नियोजित केली होती. यामध्‍ये लक्ष्मीपूजनाच्‍या दिवशी सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्‍ही शहरांत महापालिकेच्‍या कर्मचार्‍यांनी रात्रभर स्‍वच्‍छता करत तिन्‍ही शहरे स्‍वच्‍छ केली आहेत. या विशेष मोहिमेमध्‍ये २८१ टन कचरा संकलित करण्‍यात आला आहे.

महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक सुनील पवार यांच्‍या नियोजनानुसार आणि उपायुक्‍त राहुल रोकडे, उपायुक्‍त वैभव साबळे आणि उपायुक्‍त स्‍मृती पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम पार पडली. ‘विशेष स्‍वच्‍छता मोहिमे’मध्‍ये महापालिका क्षेत्रात रात्री ९ ते १ या वेळेत महापालिका आरोग्‍य विभागाच्‍या कर्मचार्‍यांकडून रस्‍त्‍यावरील कचरा उचलण्‍यात आला.

रात्रीच्‍या सत्रामध्‍ये तिन्‍ही शहरांत एकाच वेळी स्‍वच्‍छता झाल्‍यामुळे, तसेच तिन्‍ही शहरांमध्‍ये तात्‍काळ कचरा उचलला गेल्‍यामुळे नागरिकांकडून महापालिका प्रशासनाच्‍या नियोजनाचे कौतुक होत आहे. आरोग्‍य अधिकारी डॉ. वैभव पाटील आणि आरोग्‍य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्‍या नियंत्रणाखाली सांगलीत वरिष्‍ठ स्‍वच्‍छता निरीक्षक युनूस बारगीर, तर मिरज आणि कुपवाड परिसरात वरिष्‍ठ स्‍वच्‍छता निरीक्षक अनिल पाटील यांच्‍यासह पथकाने विशेष सहभाग घेतला.