दापोली – कुटुंबांमुळेच संस्कार निर्माण होतात. त्यामुळे कुटुंबाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संचालक राजन दळी यांनी व्यक्त केले. येथील सांस्कृतिक वार्तापत्रच्या ‘मी’ला आम्ही करणारे कुटुंब’ या विषयावरील दिवाळी अंकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.
श्री. राजन दळी पुढे म्हणाले, ‘‘ शहरातील संवाद आता हरवला आहे. पूर्वी गावात केवळ प्राथमिक शिक्षणाची सुविधा असल्याने पुढील शिक्षण घेण्यासाठी शहरातील नातेवाइकांकडे रहावे लागत होते. त्यामुळे नात्यातील गोडवा टिकून रहात होता. आता गावागावांत दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा असल्याने नातेवाइकांकडे रहावे लागत नाही.
भारतात झालेल्या जी-२० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वसुंधरा हेच कुटुंब’ अधोरेखित केले होते.’’ उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनीही या वेळी कुटुंबाचे महत्त्व सांगितले. दापोली अर्बन बँक सीनिअर सायन्स कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या दिवाळी अंकाचे विमोचन करण्यात आले. ओंकार पाठक यांनी प्रास्ताविक केले. या वेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रवींद्र कालेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले आणि ओंकार पाठक होते.