कुर्ला (मुंबई) येथील ‘फिनिक्स’ मॉलच्या बाहेर इस्लामप्रमाणे दिवाळीच्या शुभेच्छा !
मुंबई – कुर्ला येथील ‘फिनिक्स’ या प्रसिद्ध मॉलच्या बाहेर दिवाळी या हिंदूंच्या पवित्र सणानिमित्र ‘शुभ दीपावली’ किंवा ‘दिवाळीच्या शुभेच्छा’ यांऐवजी चक्क ‘जश्न-ए-दिवाळी’ अशी इस्लामप्रमाणे शुभेच्छा देणारी विद्युत् रोषणाईची आरास मनसेच्या कार्यकर्त्यांनी मॉलच्या व्यवस्थापकांना हटवण्यास भाग पाडली.
सौजन्य एबीपी माझा
याविषयी मनसेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले, ‘‘हिंदूंचे सण चेष्टेत साजरे करण्यात येत आहे. आम्हाला कुणाच्या धर्माचा अपमान करायचा नाही. अन्य धर्माच्या सणांच्या वेळी ‘जय श्रीराम’ असे लिहिण्यात येते का ? हिंदीमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा लिहायच्या होत्या, तर ‘दिपावलीकी हार्दीक शुभकामनाएं’ असेही लिहिता आले असते; परंतु जाणीवपूर्वक ‘जश्न-ए-दिवाळी’ असे लिहून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आम्हाला कोणताही वाद निर्माण करायचा नाही; मात्र हिंदूंच्या सणांच्या वेळी असे प्रकार चालणार नाहीत.’’
मनसेच्या कार्यकर्त्यांच्या कृतीचे सामाजिक माध्यमांवरून मोठ्या प्रमाणात समर्थन करण्यात येत आहे. यामध्ये अनेकांनी ‘फिनिक्स’ मॉलवर बहिष्कार घालण्याचे आवाहनही केले आहे.