‘१६.२.२०२३ या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी उठल्यापासूनच मला ‘महाशिवरात्रीचा उत्सव चालू झाला आहे’, असे जाणवत होते. माझे मन आनंदात असल्यामुळे मी जणू वेगळ्याच विश्वात वावरत होते. त्या दिवशी कधी एकदा भक्तीसत्संग आरंभ होतो, याची मी उत्सुकतेने वाट पहात होते.
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेल्या विशेष भक्तीसत्संगाच्या संदर्भात डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले यांना आलेल्या अनुभूती !
१ अ. महाशिवरात्रीनिमित्त १२ ज्योतिर्लिंगांच्या कथांसह त्यांची चित्रे दाखवत असतांना साधिकेचा शिवाप्रतीचा भक्तीभाव उचंबळून येणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मुखातून ‘ सर्व शिवभक्तांना नमस्कार !’ हे शब्द कानी पडताच माझ्या अंगावर रोमांच आले. नंतर महाशिवरात्रीनिमित्त १२ ज्योतिर्लिंगांच्या कथांसह त्यांची चित्रे दाखवत असतांना माझा शिवाप्रतीचा भक्तीभाव उचंबळून येत होता. ‘देवाधिदेव महादेवाने तुरुंगात असलेल्या भक्ताच्या रक्षणासाठी तेथेही जाऊन असुरांचा नाश केला’, हे ऐकल्यावर माझे हृदय भावभक्तीने भरून आले.
१ आ. भक्तीसत्संगाच्या शेवटी लावलेले भक्तीगीत ऐकल्यावर आलेली अनुभूती : श्रीसत्शक्ति ( सौ.) बिंदाताई यांच्या भावपूर्ण शब्दांमृताचा वर्षाव चालू असतांना पार्श्वसंगीतातील डमरुचा नाद आणि वीणेचा झंकार माझ्या मनाला संगीतमय विश्वातील शिवतत्त्वात चिंब भिजवत होता. भक्तीसत्संगाच्या शेवटी लावलेल्या भक्तीगीताने तर या सर्वांवर कडीच केली.
आदिदेव महादेव दयानिधे।
नीलकंठ पार्वतीश कृपानिधे ॥
हे बोल तर अजूनही माझ्या हृदयात गुंजन करत सर्वांगात पसरत आहेत. प्रत्यक्ष भक्तीसत्संग संपला, तरी या भक्तीगीतातील बोलांनी माझे हृदय शिवमय केले होते.
१ इ. भक्तीसत्संगाचा परिणाम सायंकाळपर्यंत टिकून रहाणे आणि तेव्हा खोलीतील देवघरातील पितळ्याची श्रीविष्णूची मूर्ती अन् पाषाणाची शिवपिंडी यांकडे पाहिले असता त्या दोन्ही मूर्ती जागृत झाल्याचे जाणवणे : सायंकाळी देवघरात दिवा लावतांना मी माझ्या खोलीच्या देवघरातील पितळ्याची श्रीविष्णूची मूर्ती आणि पाषाणाची शिवपिंडी यांकडे पाहिले असता मला त्या दोन्ही मूर्ती जागृत झाल्याचे जाणवले. श्रीविष्णु सोन्याच्या अलंकारांनी नखशिखांत सजलेला आहे, तर त्याच्या समोरच लहानशी शिवपिंडी केवळ बेलपत्री आणि अक्षतांनी सजलेली असूनही तितकीच गर्भश्रीमंत असल्याचे जाणवले. श्रीविष्णूच्या अंगावर सोन्याचे अलंकार असले, तरी तो आतून शिवपिंडीसारखाच वैरागी आहे. शिवपिंडीतून निर्गुणतत्त्व प्रक्षेपित होत होते. माझी सतत भावजागृती होत होती. हा सर्व भक्तीसत्संगाचा परिणाम होता.
२. १८.२.२०२३ ला महाशिवरात्रीच्या दिवशी साधिकेला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !
२ अ. १८.२.२०२३ ला ‘महाशिवरात्रीच्या दिवशी साक्षात् शिवाचे आगमन खोलीत होणार’, या कल्पनेने विविध प्रकारच्या अनुभूती येणे : ‘१८.२.२०२३ या महाशिवरात्रीच्या दिवशी साक्षात् शिवाचे आगमन खोलीत होणार’, या कल्पनेने माझे शरीर आणि मन पुष्कळ फुलासारखे हलके झाल्यासारखे जाणवत होते. माझ्या देहाचे वजनही मला जाणवत नव्हते. मी शिवपिंडीची पूजा कधी आणि कशी केली, ते मला समजलेच नाही. माझा दिवसभर ‘आदिदेव, महादेव, दयानिधी’, हा जप अखंड चालू होता. रात्री ११ वाजता मी ध्यानमंदिरात नामजप करत असतांना सुगंधी धुपाचा वास दरवळला. त्या वेळी ‘शिवाची यामपूजा’ चालू असल्याचे मला जाणवले आणि धुपाचा वास दरवळून साक्षात् शिवाने आपले अस्तित्व मला दर्शवले होते.
२ आ. साधिकेकडून हृदयेश्वर शिवाच्या चरणी भक्तीमय काव्य पंक्ती आपोआपच अर्पण होणे : माझ्याकडून खालील प्रसिद्ध रामभजनातील भक्तीमय काव्यपंक्ती माझ्या हृदयेश्वर शिवाच्या चरणी आपोआपच अर्पण झाल्या.
मेरी चौखट पर चलकर, आज चारोंधाम आए हैं ।
सौभाग्य है मेरा कि, मेरे हृदयमें शिवशंभू आए हैं ।
ना रोको आज धोने दो, चरण आंखोंके पानीसे ।
बहुत खुश हैं मेरे आंसूकि प्रभु, शिवशंभू आए हैं ।
मेरे भगवान आये हैैं, चरण की धूल ले लूं मैं ।
मेरे शिवशंभूके दर्शन कर, धन्य हुई आज मैं ।
२ इ. साधिका महाशिवरात्रीला शिवाचे स्मरण करत झोपल्यावर तिच्या स्वप्नात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले येणे : महाशिवरात्रीला रात्री १२ पर्यंत तरी जागरण करायचे ठरवून नामजप करत भक्तीगीत गुणगुणत मी अंथरुणावर पडले. त्या वेळी सहजच माझ्या मनात विचार आला, ‘माझी प्रार्थना गुरुदेवरूपी शिवापर्यंत पोचली कि नाही ते मला कळेल का ?’ नंतर मी शिवाचे लोभस, प्रेमळ रूप आठवत कधी झोपले ते मला कळलेच नाही. पहाटे माझ्या स्वप्नात मला परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचे खरोखर दर्शन झाले. मी खडबडून जागी झाले, तर पहाटेचे ५ वाजले होते.
२ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी साधिकेकडून कृतज्ञता व्यक्त होणे : मी अंथरुणातच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. माझ्या मनातील विचार त्यांच्यापर्यंत पोचला याची पोचपावती त्यांनी मला दिली होती. याचा मला इतका अत्यानंद झाला की, मी तो शब्दांत व्यक्तच करू शकत नाही. माझे मन आनंदाने डोलत पुढील ओळी गुणगुणू लागले.
‘मेरे सपनेमें गुरुदेव आए हैं,
मेरे हृदयमें शिवशंभू आए हैं ।’
२ उ. शिव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दोघेही एकच असल्याची अनुभूती येणे : हे शिवशंकरा, महादेवा, शंभो आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले तुम्ही दोघेही एकच आहात. तुम्हीच माझ्यासारख्या पामर जिवाच्या सर्व इच्छा पूर्ण करून मला आनंद दिलात. मला भावभक्ती शिकवलीत यासाठी मी तुमच्या कोमल चरणी कोटीशः बिल्वपत्रे अर्पण करते.’
– श्रीचरणी शरणागत,
डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |