१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना रथात बसलेले पाहून भाव जागृत होऊन स्वतःला आवरू न शकणे
‘वर्ष २०२२ मध्ये झालेल्या रथोत्सवाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना रथामध्ये बसलेले पाहून आणि त्यांची सर्वांकडे फिरत असलेली दृष्टी पाहून माझा भाव दाटून आला. तेव्हा मी स्वतःला आवरू शकलो नाही. या आधी जेव्हा माझा भाव जागृत व्हायचा, तेव्हा मला स्वतःला आवरता येत असे.
२. पाऊस पडत असल्यामुळे सर्व साधकांनी देवाला शरण जाऊन प्रार्थना केल्यामुळे रथोत्सवाला प्रत्यक्ष देवताच उपस्थित असल्याचे जाणवणे आणि रथोत्सव निर्विघ्नपणे पार पडणे
रथोत्सवाच्या ३ दिवस आधीपासून पाऊस चालू होता. त्या वेळी मी ‘श्री वरुणदेवता, श्री पवनदेवता आणि निसर्गदेवता यांना प्रार्थना करायला पाहिजे’, असे काही साधकांना सांगितले अन् स्वतःही प्रतिदिन प्रार्थना करायला आरंभ केला. रथोत्सवाच्या २ दिवस आधीपासून आश्रमातही अशीच सामूहिक प्रार्थना करायला आरंभ केला होता. तेव्हा ‘सर्व साधक देवाला शरण जाऊन प्रार्थना करत असल्यामुळे रथोत्सवाला प्रत्यक्ष देवताच उपस्थित आहेत; म्हणून रथोत्सव निर्विघ्नपणे पार पडला आणि सर्व साधकांना भरभरून आनंद मिळाला’, असे मला जाणवले. रथोत्सव झाल्यावर काही वेळाने पाऊस आला. त्या वेळी ‘देवानेच पावसाला थांबवून ठेवले होते ’, असे मला वाटले.
३. रथोत्सवामधे सहभागी झालेल्या साधकांचा भाव जागृत होणे आणि तो रथोत्सव संपल्यावरही टिकून रहाणे
रथोत्सवात बर्याच ठिकाणांहून आलेले साधक सहभागी झाले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना रथामध्ये बसलेले पाहून साधकांचा भाव जागृत झाला होता. तो भाव रथोत्सव संपला, तरी तसाच टिकून होता. ते पाहून माझाही भाव जागृत झाला आणि हा क्षण अविस्मरणीय झाला.
हे सर्व क्षण अनुभवायला दिल्यामुळे भगवान श्रीकृष्ण आणि गुरुमाऊली यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. घनश्याम गावडे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |