लहानपणापासून सेवेची ओढ असणारी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेली आणि त्यांना अपेक्षित असे घडण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारी पुणे येथील कु. प्रांजली नारायण शिरोडकर !

पुणे येथील कु. प्रांजली शिरोडकर ही सौ. नम्रता शिरोडकर आणि श्री. नारायण शिरोडकर यांची एकुलती एक मुलगी आहे. लहानपणापासूनच तिच्‍या मनात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या प्रती पुष्‍कळ भाव असून तिला साधना आणि सेवा यांची पुष्‍कळ ओढ आहे. पुणे येथील संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांनाही प्रांजलीमध्‍ये लहान वयापासून असलेली सेवेची तीव्र तळमळ जाणवली. पू. (सौ.) मनीषा पाठक आणि प्रांजलीचे आई-वडील यांनी लिहून दिलेली सूत्रे वाचल्‍यावर ‘हीच मुले पुढे ईश्‍वरी राज्‍य चालवतील’, असे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले का म्‍हणतात ?’, ते लक्षात येते.

कु. प्रांजली शिरोडकर

१. पू. (सौ.) मनीषा पाठक, पुणे

पू. (सौ.) मनीषा पाठक

१ अ. आनंदी आणि समाधानी : ‘कु. प्रांजली नेहमी आनंदी आणि समाधानी असते.

१ आ. मायेचे आकर्षण नसणे : तिच्‍या घरची आर्थिक स्‍थिती बेेताची आहे. त्‍यामुळे तिच्‍याकडे मोजकेच साहित्‍य आहे. तिच्‍या वयाच्‍या तरुण मुलींकडे पुष्‍कळ महागडे साहित्‍य आहे. ‘तसे साहित्‍य स्‍वतःकडेही असावे’, असे विचार तिच्‍या मनात येत नाहीत. तिला मायेतील वस्‍तूंचे आकर्षण नाही.

१ इ. सेवेसाठी स्‍वतःच्‍या स्‍वभावात पालट करून युवा साधकांना साधनेत साहाय्‍य करणे : प्रांजलीचा मूळ स्‍वभाव शांत आणि अबोल होता. वर्ष २०१८ पासून तिने युवा साधकांच्‍या साधनेचे आढावे घ्‍यायला आरंभ केला. मूळ स्‍वभाव अबोल असूनही तिने सेवेसाठी स्‍वतःमध्‍ये पालट केला आणि ती काही प्रमाणात बोलायला लागली. तिने युवा साधकांच्‍या अडचणी त्‍यांच्‍या स्‍थितीला जाऊन समजून घेतल्‍या. तिने ‘त्‍यांच्‍या अडचणींवर योग्‍य दृष्‍टीकोन देणे, त्‍यांना सेवा आणि व्‍यष्‍टी साधना यांच्‍या नियोजनासाठी साहाय्‍य करणे’, असे प्रयत्न केल्‍याने युवा साधकांना तिचा आधार वाटायला लागला. या सेवेतून तिच्‍यात नेतृत्‍वगुण आणि पुढाकार घेणे हे गुणही वाढले.

१ ई. स्‍वतःमधील स्‍वभावदोष आणि अहं न्‍यून करण्‍यासाठी चिकाटीने प्रयत्न करणारी प्रांजली ! : प्रांजलीमध्‍ये ‘व्‍यक्‍ती आणि प्रसंग यांमध्‍ये अडकणे’, असा स्‍वभावदोष होता. रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी गेल्‍यावर ती एक वर्ष स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया (टीप १) करत होती. त्‍या वेळी अनेक वेळा तिच्‍यातील स्‍वभावदोष आणि अहं यांमुळे प्रसंग घडायचे; पण तिने हार मानली नाही. ‘मला गुरुदेवांना (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) अपेक्षित असे घडायचे आहे’, अशा भावाने ती प्रयत्न करत राहिली. ती म्‍हणायची, ‘देव मला रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना आणि सेवा करण्‍याची संधी देत आहे. त्‍यामुळे मनाचा कितीही संघर्ष झाला, तरी मला प्रयत्न करायचे आहेत.’ जिथे ती स्‍वभावदोष आणि अहं यांवर मात करायला अल्‍प पडायची, तिथे ती ते प्रांजळपणे सांगायची. अतिशय अल्‍प कालावधीत तिने स्‍वतःमध्‍ये पालट केले.

टीप १ – स्‍वतःमधील स्‍वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्‍यासाठी प्रतिदिन स्‍वतःकडून झालेल्‍या अयोग्‍य कृती किंवा विचार वहीत लिहून त्‍यापुढे योग्‍य कृती किंवा विचार लिहिणेे आणि दिवभरात १० – १२ वेळा मनाला ती सूचना देणे

१ उ. कृतज्ञताभाव असणे : प्रांजलीमध्‍ये पुष्‍कळ कृतज्ञताभाव आहे. कुणी तिला नवीन सेवा शिकवल्‍यावर तिला फार कृतज्ञता वाटते. ‘मला काही येत नाही. मला शिकण्‍याची संधी मिळाली. देव मला सद़्‍गुरु, संत, उत्तरदायी साधक आणि साधक या सर्वांच्‍या माध्‍यमातून शिकवत आहे’, असा तिच्‍या मनात कृतज्ञताभाव असतो. तिला सेवेची संधी मिळाल्‍यावरही तिच्‍या मनात कृतज्ञता असते.

‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), तुम्‍हीच प्रत्‍येक साधकाला ओळखून त्‍याला हिर्‍याप्रमाणे घडवत आहात’, ही तुमची कृपाच आहे. त्‍याबद्दल तुमच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

२. सौ. नम्रता शिरोडकर (कु. प्रांजलीची आई), पुणे.

सौ. नम्रता शिरोडकर

२ अ. कु. प्रांजली दोन वर्षांची असल्‍यापासून आईच्‍या समवेत सत्‍संग किंवा प्रसार यांच्‍या सेवेला जाणे आणि सत्‍संगात म्‍हणायचे श्‍लोक पाठ झाल्‍यावर ते सत्‍संगात म्‍हणणे : ‘माझ्‍या यजमानांच्‍या ओळखीच्‍या एका ताईने मला सनातनच्‍या सत्‍संगाविषयी सांगितले. तेव्‍हा प्रांजली केवळ २ वर्षांची असल्‍यामुळे मी तिला समवेत घेऊन सत्‍संगाला जायला लागले. मला त्‍या सत्‍संगात आनंद मिळायचा. गावठाण येथील सौ. रंजना वैद्यकाकू सत्‍संग घेत असत. मला त्‍यांच्‍या समवेत सत्‍संग आणि प्रसार या सेवा करण्‍याची संधी मिळाली. मी त्‍यांच्‍या समवेत शिकण्‍यासाठी जायचे, तेव्‍हा प्रांजलीही माझ्‍या समवेत येत असे. सत्‍संगात आरंभी आणि शेवटी म्‍हणायचे श्‍लोक तिला पाठ झाल्‍यावर ती ते श्‍लोक सत्‍संगात म्‍हणत असे.

२ आ. सेवेच्‍या ठिकाणी येऊन उत्‍साहाने सेवा करणारी प्रांजली ! : गुरुपौर्णिमा महोत्‍सवाची सेवा करतांना प्रांजली माझ्‍या समवेत प्रसार किंवा ग्रंथप्रदर्शन सेवा असेल, तिथे यायची. तेव्‍हा ती केवळ अडीच वर्षांची होती आणि ‘४ रुपयांना ‘सनातन प्रभात !’, असे म्‍हणून साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या वितरणाची सेवा करायची. तिचे ते बोलणे ऐकून सर्व जण तिच्‍याकडून साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’ घ्‍यायचे. तिच्‍या समवेत सर्वांना आनंद मिळायचा. ते पाहून मलाही पुष्‍कळ आनंद वाटायचा.

२ इ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना खाऊ देणारी आणि त्‍यांच्‍या चरणांवर डोके ठेवून नमस्‍कार करून त्‍यांचा आशीर्वाद घेणारी प्रांजली ! : एकदा पुण्‍यात कात्रज येथे शिबिर आयोजित करण्‍यात आले होते. सौ. वैद्यकाकू मला म्‍हणाल्‍या, ‘‘शिबिरासाठी प.पू. गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) येणार आहेत. तुम्‍हालाही तिकडे यायचे आहे.’’ ते ऐकून अडीच वर्षांची प्रांजली म्‍हणाली, ‘‘मला गुरुदेवांना खाऊ द्यायचा आहे.’’ तिने माझ्‍याकडून पातळ पोह्यांचा चिवडा करून घेतला. आम्‍ही (मी आणि प्रांजली) शिबिराला गेल्‍यानंतर मधल्‍या विश्रांतीच्‍या वेळी वैद्यकाकू मला म्‍हणाल्‍या, ‘‘प्रांजलीला घेऊन गुरुदेवांना खाऊ देऊन या.’’ मी प्रांजलीला घेऊन गुरुदेव ज्‍या खोलीत होते, तिथे गेले. खोलीबाहेर एक साधक उभे होते. मी त्‍यांना सांगितले, ‘प्रांजलीला गुरुदेवांना खाऊ द्यायचा आहे.’ त्‍यांनी ते गुरुदेवांना सांगितल्‍यावर गुरुदेवांनी प्रांजलीला खोलीत बोलावले. प्रांजलीने गुरुदेवांना खाऊ दिला आणि त्‍यांच्‍या चरणांवर डोके ठेवून नमस्‍कार केला. गुरुदेवांनी तिला उठवून तिच्‍या मस्‍तकावर हात ठेवला आणि तिला चॉकलेट दिले. तेव्‍हा प्रांजलीला पुष्‍कळ आनंद झाला.

२ ई. एकटीने शाळेत जाणे आणि शाळेचा अभ्‍यासही स्‍वतःच पूर्ण करणे : प्रांजली शाळेत जाऊ लागल्‍यानंतर आरंभी १ – २ वर्षे मी तिला शाळेत सोडण्‍यासाठी जात होते. नंतर शाळा जवळ असल्‍यामुळे ती एकटीच शाळेला जाऊन घरी परत यायची. ती घरी बसून स्‍वतःचा अभ्‍यास स्‍वतःच पूर्ण करायची. तिला कुठल्‍याही शिकवणीला घालावे लागले नाही. अनेकांनी मला तिला शिकवणीला पाठवण्‍याविषयी सुचवले; परंतु ती स्‍वत:च अभ्‍यास करत असल्‍याने मला तशी आवश्‍यकता वाटली नाही.

२ उ. नातेवाइकांना ‘प्रांजली सनातनच्‍या आश्रमात साधना करण्‍यासाठी गेली आहे’, असे स्‍पष्‍टपणे सांगणे : आता प्रांजली रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी गेली आहे. आमचे अनेक नातेवाईक मला भेटल्‍यावर प्रत्‍येक वेळी प्रांजलीच्‍या नोकरीविषयी विचारतात. आता आम्‍ही त्‍यांना ‘ती सनातनच्‍या आश्रमात साधना करण्‍यासाठी गेली आहे’, असे सांगतोेे.

प्रांजली आता रामनाथी आश्रमात गुरुदेवांच्‍या चरणी सेवारत आहे. त्‍याबद्दल गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

३. श्री. नारायण शिरोडकर (कु. प्रांजलीचे वडील), पुणे

श्री. नारायण शिरोडकर

३ अ. सनातन संस्‍थेने प्रकाशित केलेले ग्रंथ वाचल्‍यावर ते आवडल्‍यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण घेण्‍याची सेवा करणे, नंतर सत्‍संगाच्‍या ठिकाणी गेल्‍यावर प्रांजलीने सत्‍संगात नेऊन सोडणे : ‘गुुरुपौर्णिमा महोत्‍सवासाठी माझ्‍या पत्नीने (सौ. नम्रता शिरोडकर) मला अर्पण घेण्‍याची सेवा करण्‍याविषयी विचारले. मी तिला म्‍हणालो, ‘‘तुमची संस्‍था काय करते ?’, हे मला ठाऊक नाही.’’ तेव्‍हा तिने मला सनातन संस्‍थेने प्रकाशित केलेले ‘नामसंकीर्तनयोग व मंत्रयोग’  आणि ‘गुरुकृपायोग’ हे २ ग्रंथ वाचायला आणून दिले. ते वाचल्‍यानंतर मला वाटले, ‘ही संस्‍था काहीतरी वेगळी आहे.’ पूर्वी मी वेगवेगळ्‍या मार्गांतून साधना करत होतो. यानंतर मी सनातन संस्‍थेच्‍या गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण घेण्‍याची सेवा केली आणि सनातनचा सत्‍संग चालू असलेल्‍या ठिकाणी गेलो. तिथे प्रांजली जिन्‍यामध्‍ये खेळत होती. तिने मला पाहिले आणि ती मला सत्‍संग चालू असलेल्‍या ठिकाणी घेऊन गेली. तिथे मला सनातन संस्‍थेची ओळख झाली. प्रांजलीमुळेच मी साधनेत आलो.

३ आ. कु. प्रांजलीचे जाणवलेले काही वैशिष्‍ट्यपूर्ण गुण !

३ आ १. जिज्ञासू : प्रांजली लहान असल्‍यापासून आधी तिच्‍या आईच्‍या समवेत आणि ३ वर्षांची असतांना माझ्‍या समवेत सत्‍संगांना यायची. ती सत्‍संगातील सूत्रे शांतपणे ऐकून घ्‍यायची आणि घरी आल्‍यावर तिला न समजलेल्‍या गोष्‍टींवर अनेक प्रश्‍न विचारून त्‍या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्‍याचा प्रयत्न करायची.

३ आ २. शांत : तिला कुणी रागावले, बोलले, तरी ती कुणालाही उद्धटपणे उत्तर देत नाही.

३ आ ३. व्‍यवस्‍थितपणा : ‘चॉकलेटचा कागद किंवा कचरा मार्गावर टाकायचा नाही’, असे ती आम्‍हाला सांगायची आणि स्‍वतःही टाकायची नाही. ती कुठलीही कृती नीटनेटकी आणि टापटीप करण्‍यासाठी प्रयत्नरत असते.

३ आ ४. उत्तम आकलन क्षमता : प्रांजलीची आकलन क्षमता चांगली आहे. तिला एखादी गोष्‍ट एकदा सांगितल्‍यावर पुन्‍हा सांगावी लागत नाही.

३ आ ५. राष्‍ट्र आणि धर्म यांचा अभिमान असणे

अ. प्रांजली ५ वर्षांची असल्‍यापासून धर्मांधांकडून कुठलीही वस्‍तू घेत नसे. काहीही घेतांना तिचे या गोष्‍टीकडे लक्ष असते आणि ती आम्‍हालाही ते लक्षात आणून देते.

आ. ती शाळेत असतांना मार्गावर किंवा इतर ठिकाणी पडलेले राष्‍ट्रध्‍वज आणि देवतांची चित्रे गोळा करून घरी आणत असे अन् आम्‍हाला त्‍यांचे विसर्जन करायला सांगत असे.

३ आ ६. साधी आणि सात्त्विक राहणी : महाविद्यालयात जायला लागल्‍यावरही तिने कधी ‘मेकअप’ केला नाही आणि कधी आधुनिक पोषाखही घातला नाही. तिच्‍या योग्‍य आणि चांगल्‍या वागण्‍यामुळे तिच्‍या वयाची मुलेही तिच्‍याकडे आदराने पहातात.

४. प्रांजली ११ वी मध्‍ये असल्‍यापासून करत असलेल्‍या सेवा ! 

प्रांजली सतत नवनवीन गोष्‍टी आणि सेवा शिकून त्‍या करते. तिच्‍या या गुणांमुळे पू. (सौ.) मनीषाताई पाठक तिला सेवा देत असत.

अ. ती बाल आणि युवा साधक यांचा सत्‍संग घेऊन त्‍यांना साधनेसाठी प्रोत्‍साहित करत असे.

आ. ती साधनासत्‍संगाच्‍या सेवेत साहाय्‍य करत असे.

इ. तिने प्रथमोपचार शिकून घेतले आणि नंतर ती प्रथमोपचार सत्‍संगात विषय मांडत असे. ती स्‍वसंरक्षण प्रशिक्षणही शिकली.

इ. ती अनोळखी ठिकाणीही बसने प्रवास करून प्रसार करण्‍यासाठी जात असे.

ई. ती अन्‍य ठिकाणी समाजभाव सत्‍संगाचा (टीप २) विषय मांडून त्‍या सत्‍संगाच्‍या संदर्भात सेवा करणार्‍या साधकांचा आढावा घेत असे.

टीप २ : प्रत्‍येक रविवारी वाचक आणि हितचिंतक यांच्‍यासाठी सनातन संस्‍था घेत असलेला भावसत्‍संग

उ. ती ‘सामाजिक माध्‍यमांद्वारे (सोशल मिडियाद्वारे) सेवा कशी करायची ?’ याविषयी शिबिरे घेत असे आणि स्‍वतःही सामाजिक माध्‍यमांद्वारे सेवा करत असे.

ती रात्री उशिरापर्यंत सेवा करायची; पण ‘रात्री उशिरापर्यंत सेवा करतांना आपल्‍यामुळे आई-बाबांना त्रास होणार नाही’, याची ती काळजी घ्‍यायची.

५. आई-वडिलांना सांभाळण्‍यासाठी नोकरी करण्‍याचा विचार करणे आणि ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी आतापर्यंत सांभाळले आहे, पुढेही तेच सांभाळतील’, असे सांगितल्‍यावर पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी रामनाथी आश्रमात जाणे 

रामनाथी आश्रमात युवा साधकांचे शिबिर आयोजित करण्‍यात आले होते. प्रांजली त्‍या शिबिराला गेली होती. आश्रमजीवन पाहिल्‍यानंतर तिने पूर्णवेळ साधनारत रहाण्‍याचा निश्‍चय केला; पण नंतर तिच्‍या मनात विचार आला, ‘आई-बाबांनी मला लहानाचे मोठे केले आहे. आता उतारवयात त्‍यांना सांभाळणे’, हे माझे कर्तव्‍य आहे.’ तिने एका आस्‍थापनात जाऊन मुलाखत देण्‍याचे ठरवले आणि तसे मला सांगितले. ‘प्रांजली सेवेविना राहू शकत नाही’, असे मला वाटत होते; परंतु मी काही बोललो नाही. मुलाखत देऊन ती संध्‍याकाळी घरी परत आली आणि एका बाजूला बसून रडू लागली; म्‍हणून मी तिला विचारले, ‘‘काय झाले ?’’ तेव्‍हा ती रडतच मला म्‍हणाली, ‘‘मनीषाताईने (पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी) मला भ्रमणभाषवर संपर्क केला होता; परंतु मुलाखत चालू असल्‍याने मला भ्रमणभाष घेता आला नाही.’’ तेव्‍हा मी तिला म्‍हणालोे, ‘‘तुला नोकरी शोधायला कुणी सांगितले ? आम्‍हाला सांभाळणारी तू कोण आहेस ? आतापर्यंत प.पू. गुरुदेवांनी आपल्‍याला सांभाळले आहे आणि यापुढेही तेच सांभाळतील. तू तुझ्‍या साधनेकडे लक्ष दे. तू संत झालेली मला आवडेल.’’ यानंतर प्रांजली पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी रामनाथी आश्रमात गेली.

६.स्‍वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्‍याची तीव्र तळमळ !

तिने आम्‍हाला सांगितले, ‘‘जोपर्यंत माझ्‍याकडून स्‍वभावदोष निर्मूलनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी घरी परत येणार नाही.’’

पू. (सौ.) मनीषाताईंनी प्रांजलीला पुष्‍कळ साहाय्‍य केले आहे. तिला घडवण्‍यामध्‍ये त्‍यांनी केलेले प्रयत्न पुष्‍कळ साहाय्‍यभूत झाले आहेत. गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

सर्व सूत्रांचा दिनांक (३.३.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक