वाराणसी येथील बनारस हिंदु विद्यापिठात साम्यवाद्यांकडून हिंदुविरोधी घोषणा

  • ‘मोदी-योगी मुर्दाबाद’ अशाही दिल्या घोषणा !

  • साम्यवाद्यांचा हिंदुद्वेष जाणा !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील बनारस हिंदु विद्यापिठात साम्यवाद्यांकडून हिंदुविरोधी आणि स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. याविषयी काही विद्यार्थ्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी १७ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपींच्या घोषणाबाजीला विरोध करण्यासाठी तेथे आलेल्या विद्यार्थ्यांवर आरोपींनी आक्रमण केल्याचे वृत्त आहे.

पीडित विद्यार्थ्यांनी सांगितले की, गेल्या २ दिवसांपासून काही साम्यवादी विद्यार्थी विद्यापिठाच्या आवारात आंदोलन करत होते. या आंदोलनात काही बाहेरच्या व्यक्तीही सहभागी झाल्या होत्या. हे लोक ‘हिंदुत्वाची कबर खोदणार’ आणि ‘आझादी’च्या घोषणा देत होते. यावर एक व्हिडिओ प्रसारित झाला असून त्यामध्ये आंदोलक साम्यवादी विद्यार्थी पोलिसांसमोर ‘मोदी-योगी मुर्दाबाद’च्या घोषणा देतांना दिसत आहेत. (विद्यापीठ व्यवस्थापनाने राष्ट्रद्रोही विद्यार्थ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक)

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एक व्हिडिओ प्रसारित केला असून साम्यवादी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी एका महिला सुरक्षा कर्मचार्‍याचा गळा दाबल्याचा आरोप केला आहे. पीडित विद्यार्थ्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आक्रमण करणार्‍या आंदोलकांनी त्यांना ओढत नेऊन मारहाण केली, तसेच त्यांनी तक्रारदार विद्यार्थ्यांसमवेत असलेल्या दलित समाजातील तरुणांना जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.