वाहनशुल्कामुळे फेरीबोटींवर होणारा खर्च भरून येईल ! – नदी परिवहन मंत्री फळदेसाई, गोवा

फेरीबोटीत वाहनांना शुल्क आकारल्याचे प्रकरण

गोव्यातील फेरीबोट सेवा

पणजी : फेरीबोटीतून प्रवास करणार्‍या नियमितच्या प्रवाशांसाठी ‘पास’ पद्धत चालू केल्यास दुचाकीचालकांना महिन्याला केवळ १५० रुपये खर्च येणार आहे, तर चारचाकीवाल्यांना महिन्याला ६०० रुपये खर्च येणार आहे. म्हणजे दुचाकीसाठी प्रतिदिन एका फेरीला अडीच रुपये, तर चारचाकीला २० रुपये शुल्क होते. हे शुल्क चालू केल्यास नदी परिवहन खात्याला महिन्याला ४-५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. सध्या खात्याला फेरीबोटीच्या उत्पन्नातून वार्षिक केवळ ७० लाख रुपये मिळतात, तर त्यांच्यावरील वार्षिक खर्च ४० ते ५० कोटी रुपये आहे, अशी माहिती नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

नदी परिवहन खात्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यावर त्याला विविध घटकांकडून विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी वरील माहिती दिली.

 (सौजन्य : prime media goa)

फळदेसाई पुढे म्हणाले, ‘‘दिवाडी, चोडण आदी बेटांवर रहाणार्‍या प्रवाशांना वर्ष १९९५ मध्ये एका फेरीसाठी दुचाकीला ५ रुपये द्यावे लागत असत. त्या तुलनेत आताची ‘पास’ पद्धत स्वस्त आहे. तत्कालीन नदीपरिवहन मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी स्वतःच्या लोकप्रियतेसाठी दुचाकी आणि चारचाकी यांवरील शुल्क रहित केले होते. बेटांवरून नियमित वाहतूक करणार्‍यांनी ‘पास’ वापरल्यास वर्ष १९९५ च्या तुलनेत आताचे दुचाकीचे शुल्क अत्यंत अल्प आहे आणि चारचाकीचे पूर्वी होते तेच आहे. कधीतरी या मार्गाने प्रवास करणारे वाहनचालक आणि पर्यटक यांना चारचाकीसाठी ४० रुपये द्यावे लागतील. यामुळे खात्याचा महसूल वाढेल. फेरीसेवेच्या अत्याधुनिकीकरणासाठी प्रस्ताव मांडल्यावर महसूल विभागाकडून प्रत्येक वेळी फेरीसेवेतून महसूल मिळत नसल्याचे सूत्र सांगितले जाते. त्यामुळे सामान्य नागरिकांचा खर्च न वाढवता फेरीबोटीतील वाहनांना शुल्क आकारले जात आहे.’’

फेरीबोट शुल्कवाढ मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याची काँग्रेसची चेतावणी

जुने गोवे : येथील फेरीबोट धक्क्याजवळ काँग्रेसकडून फेरीबोट शुल्कवाढीच्या विरोधात ५ नोव्हेंबरला आंदोलन करण्यात आले. या वेळी फेरीबोट शुल्कवाढ मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याची चेतावणी काँग्रेसने दिली. ‘राज्यातील अनेक महामंडळांना नफा होत नसतांनाही तेथे दरवाढ केली जात नाही. कदंब महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा होतो; परंतु बस दरवाढ करण्यात आलेली नाही. फेरीबोट शुल्कवाढ करून सामान्यांवर अन्याय केला जात आहे. फेरीबोटीच्या माध्यमातून भ्रष्टाचार करण्याची सिद्धता केली आहे’, असा आरोप काँग्रेसने केला आहे.