ललित याला पळवून लावण्यात कोणत्याही डॉक्टरांचा सहभाग नाही ! – डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

आरोपी ललित पाटील

पुणे – ‘महाविद्यालय आणि रुग्णालयाची देखरेख करणे, हे काम अधिष्ठाता करतात. व्यवस्थापक, मेडिकल (औषध) व्यवस्थापक यांचा पूर्ण रुग्णालयावर अधिकार असतो. रुग्णावर उपचार करणे, हे आधुनिक वैद्यांचे काम असते. कोणत्याही आरोपी रुग्णाला पळवून लावण्यात कुठल्याही आधुनिक वैद्यांचा हात असेल, असे मला वाटत नाही. कोण काय बोलते ? यावर मी भाष्य करू शकत नाही’, असे ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’चे अधिष्ठाता संजीव ठाकूर म्हणाले. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या दूरचित्रवाहिनीशी बोलत होते. अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील याला पळून जाण्यास साहाय्य केल्याचा आरोप संजीव ठाकूर यांच्यावर होता. त्यावर त्यांनी वरील भाष्य केले.

अधिष्ठाता संजीव ठाकूर म्हणाले, ‘‘ललित पाटीलसारखे असंख्य आरोपी आमच्याकडे येत असतात. माझ्यासह कुठल्याही आधुनिक वैद्याचा कधीही संबंध नव्हता आणि येणार नाही. ललित याला पळवून लावण्यात कुणाचेही आर्थिक हितसंबंध नाहीत.’’ ललितला ‘व्हीआयपी’ (अतीमहनीय व्यक्ती) उपचार मिळावा यासाठी मंत्र्यांचे दूरभाष येत होते का ? असे विचारल्यावर ठाकूर म्हणाले, ‘‘कुठल्याही राजकीय नेत्याने मला दूरभाष केला नाही. आरोपीला ‘व्हीआयपी’ उपचार दिलेले नाहीत.’’