Britain Hinduphobia : ब्रिटनमध्ये हिंदुद्वेषाच्या घटनांत ८० टक्क्यांनी वाढ ; लंडन विधानसभेत प्रस्ताव संमत !

भारतीय वंशाचे कृपेश हिरानी यांनी मांडला प्रस्ताव !

कृपेश हिरानी

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये हिंदुद्वेषाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्या विरोधात लंडन विधानसभेमध्ये प्रस्ताव संमत करण्यात आला. भारतीय वंशाचे कृपेश हिरानी यांनी ‘ग्रेटर लंडन अ‍ॅथॉरिटी’चे महापौर म्हणून हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावात लंडन पोलिसांनी हिंदुद्वेषाच्या घटनांवर कठोरतेने पावले उचलण्याचा आग्रह करण्यात आला आहे. या प्रस्तावात हिंदुविरोधी गुन्ह्यांचा समावेश धर्मविरोधी गुन्ह्यांच्या श्रेणीमध्ये करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

ब्रिटनच्या गृहमंत्रालयाने प्रसारित केलेल्या आकड्यांनुसार वर्ष २०२२-२३ या कालावधीत हिंदुद्वेषाचे २९१ गुन्हे घडले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ८० टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी हिंदुद्वेषाच्या १६१ घटना घडल्या होत्या. प्रस्तावामध्ये हिरानी पुढे म्हणाले की, मेट्रोपोलिटन पोलिसांनी हिंदु समुदायासमवेत काम केले पाहिजे. त्यांच्यात विश्‍वास वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. धर्माच्या आधारावर द्वेष होण्याच्या घटनांमध्ये हिंदु समुदाय दुसर्‍या क्रमांकावर आहे. हे चांगले आहे की, लंडन विधानसभा ही हिंदुद्वेषाच्या घटनांमध्ये पोलिसांना उत्तरदायी ठरवण्याचे समर्थन करते.